धुळे : महापालिकेच्या स्थायी समितीत नवीन आठ सदस्यांची एन्ट्री झाली. तर महिला बालकल्याण समितीत सर्व अकरा सदस्यांची नामनिर्देशनातून नियुक्ती झाली. या दोन्ही समित्यांमधील सदस्यांच्या नावांकडे नजर टाकली तर अपवाद वगळता सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील सदस्यांना या समित्यांमध्ये पुन्हा-पुन्हा लॉटरी लागल्याचे चित्र दिसते. पंचवार्षिकमधील सरत्या टर्ममध्ये उरल्या-सुरलेल्यांसह कोविड काळात कार्यकाळ वाया गेल्याची भावना असलेल्यांनाही संधी मिळाली. एकूणच गेल्या पाच वर्षात सत्ताधारी, विरोधी पक्षांनी पदाधिकारी, सदस्य या रूपाने आपल्या सर्वच नगरसेवकांना संधी देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे उपमहापौरांना ‘प्रभारी महापौर’ म्हणून महापौरांच्या खुर्चीवर बसण्याची संधीही मिळाली.
महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ १ फेब्रुवारीला संपत असल्याने त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची त्या-त्या पक्षांकडून नामनिर्देशनातून नियुक्तीसाठी तसेच महिला बालकल्याण समितीच्या सर्व ११ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवारी (ता.१८) सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. उपमहापौर नागसेन बोरसे हे प्रभारी महापौर तथा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी प्रदीप कर्पे यांनी ७ जानेवारीला महापौरपदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केल्याचा विषय सभागृहापुढे माहितीसाठी सादर झाला. त्यानंतर स्थायी समितीतील निवृत्त आठ सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली. त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून आलेली सदस्यांची नावे असलेले बंद पाकीट नगरसचिव श्री. वाघ यांनी पीठासीन अधिकारी श्री. बोरसे यांच्याकडे सुपूर्द केली. सत्ताधारी भाजपतर्फे गटनेत्या वालिबेन मंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कमलेश देवरे व समाजवादी पक्षाचे गटनेते अमीन पटेल यांनी दिलेल्या पक्षाच्या सदस्यांची नावे पीठासीन अधिकारी श्री. बोरसे यांनी जाहीर केली.
अनेकांची डबल लॉटरी
स्थायी समितीत सत्ताधारी भाजपकडून विजय जाधव, दगडू बागुल, रंगनाथ ठाकरे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वसीम खलील अन्सारी यांना प्रथमच संधी मिळाली. उर्वरित चार सदस्यांमधील भाजपच्या किरण कुलेवार व समाजवादी पक्षाच्या अन्सारी फातमा नुरुल अमीन या निवृत्त होत असल्या तरी त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर सुनील बैसाणे यांनी स्थायीचे सभापतिपद तर कल्याणी अंपळकर यांनी
उपमहापौरपद भूषविलेले असताना त्यांनी पुन्हा संधी मिळाली आहे. महिला बालकल्याण समितीतही बहुतांश सदस्य यापूर्वी स्थायी समितीत अथवा महिला बालकल्याण समितीत होते. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर महिला बालकल्याण समितीत दोन पुरुष सदस्यांचीही एन्ट्री झाली.
स्थायी समिती अशी
नवीन सदस्य ः भाजप- किरण कुलेवार, विजय जाधव, दगडू बागुल, रंगनाथ ठाकरे, सुनील बैसाणे, कल्याणी अंपळकर. राष्ट्रवादी कॉंग्रेस- वसीम खलील अन्सारी. समाजवादी पक्ष- अन्सारी फातमा नुरुल अमीन.
कायम असलेले सदस्य ः भाजप- नरेंद्र चौधरी, प्रतिभा चौधरी, किरण अहिरराव, हर्षकुमार रेलन, सारिका अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस- अन्सारी अब्दुल लतीफ अब्दुल हमीद, काँग्रेस- खान मोहम्मद साबीर मुहिबुल्लाह, एमआयएम- पठाण नाजियाबानो नासीरखाँ.
महिला बालकल्याण समिती अशी
भाजप- सारिका अग्रवाल, विमलबाई पाटील, पुष्पा बोरसे, कशिश उदासी, लक्ष्मी बागुल, वंदना थोरात, वंदना मराठे, वैशाली वराडे. काँग्रेस- खान सद्दीम हुसेन रहेमतुल्लाह. राष्ट्रवादी काँग्रेस- शेख शाहजहान बिस्मिल्ला. एमआयएम- सईद बेग हाशम बेग.