धुळे : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पदावरून दोन कार्यकारी अभियंत्यांमध्ये सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला. बदली आदेशाविरोधात मॅटमध्ये गेलेल्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांची बदली मॅटने योग्य ठरविल्याने या नाट्यातील दुसरे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील यांनी सोमवारी (ता.१६) येथील कार्यकारी अभियंतापदाची सूत्रे स्वीकारली. कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती घुगरी व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी श्रीमती घुगरी यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर २८ डिसेंबरला राज्य शासनाने श्रीमती घुगरी यांची धुळे महापालिकेत बदली केली. तर श्रीमती घुगरी यांच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी मनपातील रवींद्र पाटील यांची बदली केली होती.
मात्र, या बदली आदेशाविरोधात श्रीमती घुगरी मॅटमध्ये गेल्या होत्या. मॅटने प्रारंभी श्रीमती घुगरी यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात बांधकाम विभागात श्रीमती घुगरी यांच्यासह कार्यकारी अभियंता म्हणून बदली श्री. पाटील यांनी एकाच दालनात बसून काम सुरू केले. एकाच दालनात एकाच पदावर दोन अधिकारी काम करत असल्याचा हा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, 10 जानेवारीला श्रीमती घुगरी यांच्या अर्जावर मॅटने कामकाज सुरू झाले. सुनावणीअंती मॅटने राज्य शासनाने केलेली श्रीमती घुगरी यांची बदली योग्य ठरवत श्रीमती घुगरी यांचा अर्ज रद्द केला. या सर्व घडामोडीनंतर सोमवारी (ता.१६) कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात पदभार स्वीकारला. कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.