धुळे : शहरातील जमनागिरी भिलाटी येथे रविवारी (ता.१५) उघडकीस आलेल्या महिलेच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी २४ तासात संशयिताला शिर्डी येथून बेड्या ठोकल्या. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे व सहकाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलिस निरीक्षक श्री. कोकरे व पथकाला पाच हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला.
धुळे शहरातील साक्रीरोडवरील जमनागिरी भिलाटीत रविवारी महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली. निता वसंत गांगुर्डे (वय-३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (वय-२८, रा. रमाबाई आंबेडकर नगर, ग. नं.९, देवपूर, धुळे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. बहीण निता हिला बादल रामप्रसाद सोहिते/नाहार (वय-४०) याच्या सोबत लग्न करावयाचे म्हणून मार्च-२०२० पासून घरातून निघून गेली होती. बादल सोहित व निता हे दोघे गेल्या चार-पाच महिन्यांपासून जमनागिरी भिलाटीत एकत्र राहत होते. दरम्यान बादल सोहिते हा निताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. १४ जानेवारीला रात्रीही त्याने नितास चारित्र्याचे संशयावरून चेहऱ्यावर मारहाण करून तिचा खून करून फरार झाला होता. बादल सोहिते याच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेत धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कोकरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, कुंदन पटाईत, निलेश पोतदार, मनिष सोनगीरे यांच्या पथकाने गुन्ह्यातील फरार संशयित बादल सोहिते याला शिर्डी येथून ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत असून त्यांना कामकाजात मच्छिंद्र पाटील, विजय शिरसाठ, अविनाश कराड, प्रवीण पाटील, तुषार मोरे, शाकीर शेख, गुणवंत पाटील, प्रसाद वाघ, महेश मोरे, गौरव देवरे हे सहकार्य करत आहेत. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.