Chopada : सी. बी. निकुंभ माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, घोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील सहावी ते बारावीच्या मासिक ऋतू चक्रातून जाणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना अशय सोशल ग्रुपतर्फे प्रत्येकी चार असे ऋतू कापडी पॅडचे वाटप करून ते का व कसे वापरावे या विषयी सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. एकूण ४०० मुलींना ऋतू कापडी पॅडचे वाटप करण्यात आले.
कापडी पॅडच का?
पाळीच्या वेळी हल्ली सरसकट वापरला जाणारा पर्याय म्हणजे प्लॅस्टिकचे सॅनिटरी नॅपकिन्स. हे खरेतर आरोग्यासाठी अयोग्य ठरतात. तसेच, महिन्याला एक स्त्री किंवा मुलगी साधारणपणे कमीत कमी १२-१५ पॅड वापरते. पॅड वापरून झाला की, तो रद्दी पेपरमध्ये गुंडाळून प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून रोजच्या कचऱ्यात फेकून दिला जातो. प्लॅस्टिकचे जमिनीत विघटन होत नाही. जमिनीचा पोत खराब होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होतो. प्रत्येक महिन्यात सॅनिटरी नॅपकिनचा खर्च देखील वेगळाच. कापडी पॅड हे सुती कपड्याने बनविलेले असते. त्यात एक प्रतिबंधक कापडाचा (pul) एक थर वापरला जातो. ज्यामुळे, इतर कपडे खराब होत नाही व डाग पडण्याची चिंता राहत नाही. शिवाय,
कापडी पॅड धुण्याची पद्धत खूप सोपी आहे. चार कापडी पॅडचा सेट साधारण, तीन-चार वर्षे चालू शकतो.
कापडी पॅड हे आरोग्यासाठी सुरक्षित आहेत तसेच पर्यावरणपूरक व आर्थिक बचत करणारे आहे.
मुलींना पर्यावरणपूरक हा शाश्वत पर्याय देवून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.
अशय सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सीमा खंडाळे दरवर्षी असा आगळा वेगळा उपक्रम राबवितात. उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. एक गट निवडून त्या गटासाठी देणगी गोळा करून त्यांना कापडी पॅड उपलब्ध करून देतात. हे कापडी पॅड कसे व का वापरावे या विषयी जनजागृतीही करतात. स्वतः साठी असे कापडी पॅड कसे बनवावेत या विषयी प्रशिक्षण देतात.
कापडी पॅड कसे वापरावे, त्यांची काळजी कशी घ्यावी, ते कसे धुवावे या विषयीची सगळी माहिती सविस्तरपणे सांगण्यात येते. चार कापडी पॅडचा सेट साधारण तीन ते चार वर्षे वापरला जावू शकतो. यामुळे कुठलाही कचरा होत नाही तसेच आर्थिक बचत होते.