धुळेः शहरातील नकाणे रोड परिसरातील शिक्षक कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका निवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटात ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने व 15 हजाराची रोख रक्कम लंपास केली.
मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील नकाणे रोडवरील शिक्षक कॉलनीतील (माऊली बंगला ) प्लॉट नं. 6 येथे निवृत्त मुख्याध्यापक भाईदास दोधु देसले हे रहातात. काल त्यांच्या नातीचा वाढदिवस असल्याने ते साधारण तीन ते चार दिवसांपुर्वी पुणे येथे गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटांची तोडफोड करीत त्यांनी कपाटातील 20 तोळे सोने व 15 हजारांची रोकड लंपास केली. आज पहाटे पुण्याहून आल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापक भाईदास देसले यांच्या हा सर्व प्रकार निदर्शनास आला त्यांनी तत्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे दाखल होऊन त्यांनी पाहणी केली व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.