धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे ता. शिरपूर गावानजीकच्या तापी नदी पुलावर मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने क्रुझर उलटली. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने अवजड वाहन पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळले. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैजापूर येथून MP 09 FA 6487 क्रमांकाची क्रुझर मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात होती. त्यातील 26 मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नदीत कोसळलेल्या अवजड वाहनात नेमके किती प्रवासी होते हे सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगातले. त्यामुळे मृतांचा आकडा राञी उशिरापर्यंत कळू शकला नाही. घटनास्थळी शिरपूर शहर व नरडाणा पोलीस दाखल झाले आहेत. अंधार असल्याने मदत आणि बचावकार्यात व्यत्यय येत आहे.