धुळे (dhule): राष्ट्रध्वज (tiranga) हा आपला अभिमान असल्याने प्रत्येक नागरीकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय ध्वज इतस्त: दिसून आल्यास स्वयंसेवकांच्या माध्यमातून संकलन करून योग्य त्या सन्मानाने विल्हेवाट लावावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड (sanjay barkund) यांनी केले आहे.
राष्ट्रीय सणाच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणत खरेदी व विक्री केली जाते. लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्तीमुळे उत्साहापोटी राष्ट्रध्वज खरेदी करतात. ते ध्वज त्याचदिवशी व दुसऱ्या दिवशी इतस्त: टाकले जाण्याची व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी स्वयंसेवकांमार्फत राष्ट्रध्वज संकलित करून त्याची सन्मानाने विल्हेवाट लावावी, असेही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.