धुळे(dhule): शहरातील नागरिकांना लवकरच दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन (girish mahajan-minister) यांनी पुन्हा एकदा दिले. प्रजासत्ताक दिनी मुख्य ध्वजारोहण सारंभानंतर ते धुळ्यात प्रसारमाध्यमांशी (media) बोलत होते.
धुळेकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन महानगरपालिकेच्या (dhule mahapalika) निवडणुकीत भाजपच्या पुढार्यांनी दिले होते. परंतु गेल्या चार वर्षात दररोज पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारी भाजप पक्ष अपयशी ठरला.
नागरी सुविधांबद्दल जाहीर आश्वासने देऊन महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपची आता मात्र एकही आश्वासन पूर्ण होत नसल्याने अडचण झाली आहे. निवडणूकपूर्व सभांमधून तत्कालीन नेते आणि मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन धड पूर्ण झालेले नसल्याचा आरोप आता सर्वसामान्य धुळेकरही उघडपणे करू लागले आहेत. एवढेच काय, महापालिकेच्या निरनिराळ्या सभांमध्येही विविध प्रश्नांवर स्वकियांकडूनच सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येऊ लागल्याने भाजपच्या प्रतिमेला तडे जात आहेत. विशेष म्हणजे आता तर, वकिलांनीही रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांसाठी महापालिकेला धारेवर धरले आहे. ही संधी साधून विरोधकही सत्ताधारी भाजपवर तुटून पडले आहेत.
मूलभूत नागरी सुविधांपैकी प्रामुख्याने पिण्याचे पाणी, शहरांतर्गत रस्ते, स्वच्छता याबाबतीत सध्या ना सत्ताधारी समाधानी ना विरोधक, ना धुळेकर, अशी स्थिती आहे. शेकडो आश्वासने जाहीरनाम्यांमधून देणाऱ्या भाजपला धुळेकरांनी याच आधारावर बहुमताने सत्तेवर बसविले. महापालिकेत सत्ता मिळाल्यावर मात्र भाजपने या आश्वासनांकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली. आश्चर्य म्हणजे धुळे शहराला रोज पाणी पुरवठा करता येऊ शकेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असतांनाही धुळेकरांना तब्बल आठ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे प्रत्येकाला आठ दिवस पुरेल इतपत पाणी साठवून ठेवणे भाग पडत आहे. जलवाहिनी आणि गटारीचे काम करण्याच्या निमित्ताने खोदण्यात आलेले रस्ते अनेक ठिकाणी जीवघेणे ठरले आहेत. महापालिकेची निवडणूक झाल्यावर भाजपच्या नेत्यांनी आणि महापौरांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, यासाठी निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. परंतु, कुठलीही ठोस कामे होताना दिसत नाहीत.
आता पुन्हा निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासोर ठेवून भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आश्वासनांची सरबत्ती सुरु केली आहे. धुळे शहरात लवकरच दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पालकमंत्री पुन्हा एकदा दिले. परंतु नेमके हे आश्वासन कधी पूर्ण होईल हे मात्र ते सांगू शकले नाहीत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधार्यांचे अजुनही नियोजन नसल्याचे दिसते, अशा प्रतिक्रिया आहेत.