#mummyकैरो (kairo) : इजिप्तची (egypt) राजधानी कैरोच्या दक्षिणेला असणार्या सकवारा नावाच्या दफनभूमीत सोन्याच्या पानांनी मढवलेली ममी दगडी ‘शवपेटीत सापडली असून ती तब्बल ४३००वर्षे उघडली गेली नव्हती.
पंधरा फूट खोल खड्ड्या ही ममी होती. शिवाय तिथे तीन थडगीही आढळली आहेत. ही ममी हेकाशिप्स (hekaships) नावाच्या एका माणसाची आहे आणि कदाचित इजिप्तमधल्या सर्वांत जुन्या ममीपैकी एक असावी, असा पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ममी शाबूत अवस्थेत आहे आणि विशेष बाब म्हणजे ती राजघराण्यातल्या सदस्याची नाही.
राजघराण्याचा सदस्य नसणार्या माणसाची अशा प्रकारची ममी सापडणे हे दुर्मीळ मानले जात आहे. जी तीन थडगी सापडली त्यातील सगळ्यात मोठे थडगे एका खुनुमदेजेफ नावाच्या माणसाचे असून तो धर्मगुरू आणि उच्चकुलीन लोकांचा निरीक्षक म्हणून काम करायचा.
दुसरे थडगं मेरी नावाच्या एका माणसाचे आहे. त्याला ‘गुप्त रक्षक’ असे पद देण्यात आले होते. या पदामुळे त्याला काही विशिष्ट धार्मिक विधी करण्याचा अधिकार मिळाला होता. तिसरे थडगे फातेक नावाच्या न्यायाधीश आणि लेखकाचे आहे. पुरातत्त्व अभ्यासक आणि इजिप्तचे पुरातन गोष्टी विभागाचे माजी मंत्री झाही हवास यांच्या मते सापडलेल्या सगळ्या गोष्टी ख्रिस्तजन्मापूर्वी २५०० ते २००० वर्षे जुन्या आहेत.
या उत्खननावर देखरेख करणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ अली अबू देशीश हे सांगतात की, हा शोध खूप महत्त्वाचा आहे. कारण, यामुळे त्यावेळच्या राजांचा त्यांच्या अवतीभोवती राहाणाऱ्या सर्वसामान्य माणसांशी कसा संबंध होता हे सहज लक्षात येते. सक्वारामध्ये गेल्या ३००० वर्षांपासून मृतदेह आणि ममींचे दफन होत आहे आणि युनेस्कोने या भागाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जादिला आहे. प्राचीन इजिप्तची राजधानी असणार्या मेंफीसमध्ये ही दफनभूमी आहे.
या नव्या ममी, दक्षिण इजिप्तमधल्या लक्सर ‘शहरात आढळलेल्या रोमन शहराच्या दुसर्याच दिवशी सापडल्या आहेत. लक्सर शहरातल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांना रोमन काळातील एक संपूर्ण रहिवासी शहर सापडले आहे. हे शहर ख्रिस्तजन्मानंतर दुसर्या किंवा तिसर्या शतकातील असावे, असा अंदाज आहे. या ठिकाणी रहिवासी इमारती, मिनार आणि धातूकाम होत असेल अशी ठिकाणे सापडली आहेत. तसेच भांडी, हत्यारे आणि रोमन नाण्यांचा दुर्मीळ खजिनाही या ठिकाणी मिळाला आहे. इजिप्त सरकारला आशा आहे की, या वर्षी सुरू होणार ग्रँड इजिप्शियन संग्रहालय येत्या २०२८ पर्यंत ३ कोटी पर्यटकांना आकर्षित केल, तथापि, काही टीकाकारांचे म्हणणे आहे की, सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी माध्यमांत चमकतील अशाच शोधांना प्राधान्य देत आहे आणि संशोधनात्मक अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहे.