#नवी दिल्ली (new delhi) : लालचुटूक व नाजूक जीवणी म्हणजेच ओठ हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. नैसर्गिकरीत्याच लाल ओठ असले किंवा नसले तरीही कृत्रिम पद्धतीने त्यांची लाली वाढवण्याचे प्रयत्न जुन्या काळापासूनच होत आले आहेत. सध्या तर लिपस्टिकचा (lipstick) महिलांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. ओठ रंगवण्याच्या या कलेलाही अतिशय प्राचीन इतिहास आहे.
प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही अशा कलेचा उल्लेख आढळतो. महिलांच्या सोळा शृंगारात ओठ (lips) रंगवण्याच्या या कलेचा समावेश होतो. लाल लाख आणि मेणाचा वापर करून ओठ रंगवण्याच्या कलेचा उल्लेख भारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. सिंधू संस्कृतीमध्येही काव किंवा लाल मातीच्या आयताकृती तुकड्यांचा वापर ओठ रंगवण्यासाठी केला जात असे. काही पाश्चिमात्य इतिहासकारांच्या मते, सुमेरियन लोकही आपले ओठ रंगवत असत. त्यासाठी काही रत्नांनाही
उगाळून त्याचा लेप ओठांना लावला जात असे.
काही ठिकाणी फळांचा किंवा फुलांचा रस ओठांना लावला जाई. प्राचीन इजिप्तमधील सौंदर्यवती राणी क्लिओपात्रा किंवा तिच्या काळातील इजिप्शियन महिला विशिष्ट किड्यांची पेस्ट बनवून तिचा वापर ओठ रंगवण्यासाठी करीत. मेणाच्या लिपस्टिकचा वापर एक हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरू झाला असे म्हटले जाते. सन १८८४ मध्ये फ्रेंच परफ्यूम कंपनी गुलेरियनने लिपस्टिकची पहिली व्यावसायिक विक्री सुरू केली. १९१५ मध्ये लिपस्टिक पहिल्यांदाच सिलेंडरिकल ट्यूब्सच्या रूपात आली जी मॉरिस लेवीने बनवली होती. हॉलीवूडच्या अभिनेत्रींनी लिपस्टिकला फॅशनमध्ये आणले व #१९२० च्या दशकापर्यंत लिपस्टिकचा जगभर प्रसार झाला.
#१९२३ मध्ये जेम्स ब्रूस मेसन ज्युनियर यांनी लिपस्टिकचा फिरणारा सिलेंडिकल आकार बनवला जो आजही प्रचलित आहे.