मूकनायक (muknayak) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr. babasaheb ambedkar) यांचे पाक्षिक. ३१ जानेवारी १९२० ला सुरू झालेल्या त्या पत्राने अल्पावधीतच आंबेडकरी चळवळीच्या प्रभावी मुखपत्राचे स्थान प्राप्त केले.
आंबेडकरी चळवळीच्या मुखपत्राचे सध्या शताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी एखादे वृत्तपत्र, मासिक, नियतकालिक, अनियतकालिक अथवा पाक्षिकसुद्धा काढणे खूप अवघड होते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक काढले. ती अस्पृश्य समाजाची गरज होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडायची होती. त्यांच्या भणंग आयुष्याला नवी कलाटणी द्यायची होती. नवचैतन्य पेरायचे होते. अस्पृश्य समाजाची दशा पालटायची होती. दिशा द्यायची होती. अस्मिता नि अस्तित्व बहाल करायचे होते. ही निकड लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी काढला. १४ हरारवाला बिल्डिंग, पोयबावडी, परेल, मुंबई या कार्यालयातून तो प्रकाशित होत असे. ‘मूकनायक’ या शीर्षकाखाली संत तुकारामाच्या (sant tukaram maharaj) अभंगाचे ब्रीद लिहिलेले होते.
काय करूं आतां धरूनिया भीड|
नि:शंक हे तोंड वाजविले||
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण|
सार्थक लाजून नव्हे हित||
मूकनायकचे एकूण १९ अंक प्रकाशित झाले. प्रत्येक अंकाचे वेगळेपण आहे. मूकनायक अल्पकाळ जगले असले, तरी तत्कालीन अस्पृश्य समाजाला त्याने कायमचे जगविले. ते एखाद्या ताऱ्याप्रमाणे प्रकाशदायी ठरले. समाजप्रबोधनाचा वसा घेऊन जनसामान्यांचा आवाज या पत्रातून बाबासाहेबांना बुलंद करता आला. गाऱ्हाणी मांडता आली. मूकनायक पाक्षिकाचा जन्म म्हणजे जातीअंताच्या पर्वाची ठिणगी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे संपादकत्वाची जबाबदारी त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर यांच्यावर सोपवली. मात्र लिखाणाची बहुतांश जबाबदारी स्वतः बाबासाहेब पेलत असत. डॉ. आंबेडकरांची वृत्तपत्रीय कारकीर्द १९२० पासून झाली. मूकनायकातील एकूण १३ लेख-अग्रलेख आहेत. त्यापैकी ११ अग्रलेख बाबासाहेबांनी लिहिले आहेत. लेख-अग्रलेख हे वर्तमान वास्तव आणि भविष्यातील वेध घेणारे आहेत. आजच्या राजकीय परिस्थितीचा लेखाजोखा त्यांच्या अग्रलेखाची आठवण करून देतो. सामाजिक, धार्मिक लेखांची मार्मिकता अधोरेखांकित करता येते. अस्पृश्य, बहिष्कृत वर्गाला या पाक्षिकाने वैचारिक खाद्य पुरविले. महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह आदी आंदोलनांची वैचारिक भूमिका मांडण्यात या पाक्षिकाची भूमिका मोलाची होती.
विषमतावादावर प्रहार
सामाजिक, वैचारिक जाणिवेने ओतप्रोत असलेले त्यांचे अग्रलेख केवळ सम्यक क्रांतीची दिशाच नव्हे, तर माणसाला प्रतिष्ठा, सन्मान बहाल करण्याचे काम करतात. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले. शिक्षण विचारही त्यात अंतर्भूत होता. यासंदर्भात बाबासाहेब म्हणतात, की मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे शक्य तितक्या लवकर सुरू व्हावे. डॉ. आंबेडकरांनी सनातनी धर्म, जातीव्यवस्थेला ठोस युक्तिवाद आणि बिनतोड प्रतिपादन यांनी हादरे दिले. जातिधर्माच्या विषमतावादी धोरणावर त्यांनी प्रहार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रीय भाषा आणि ग्रंथलेखनाची भाषा वेगळी आहे. वृत्तपत्रीय मराठी भाषा उपरोधिक आहे. त्यात दृढनिश्चयी प्रतिपादन आहे. ही भाषा अलंकृत असली तरी बोजड नाही. त्यात वाक्प्रचार, म्हणी, दृष्टांत, सुविचार अशा विविधरंगी मराठी भाषेचा प्रयोग करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पाक्षिक, वृत्तपत्रातील मराठी भाषा समृद्ध होती, यात शंका नाही.
सहज, सोपी भाषा
मूकनायकमधील लेखांची भाषा सहज, सोपी होती. ती जनसामान्यांची भाषा होती. दंभस्फोट करणारी ही भाषा दिशादर्शक होती. त्यामुळेच जनसामान्यांचे परिवर्तन करता आले. पौराणिक दाखले, कथांचा वापर करताना खरे-खोटे तपासून पाहिल्याशिवाय सांगत नव्हते. अशा या मराठी-इंग्रजी वैभवशाली संपन्नतेची साक्ष बाबासाहेबांनी आपल्या लिखाणात अधोरेखित केली आहे.
मूकनायक पाक्षिकातील पत्रव्यवहारही वाचनीय असे. वर्तमानातील घडामोडींवर भाष्य करणारे लिखाण त्यात प्रसिद्ध होत असे. मूकनायक पाक्षिक काढण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी २५०० रुपयांचे अर्थसाह्य केले होते. त्यानंतर काही दिवसांनी मूकनायक आर्थिक अडचणीत सापडले, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानचे दिवाण आर. व्ही. सबनीस यांना या वृत्तपत्रास आर्थिक मदत करण्याविषयी २४ जाने १९२१ रोजी पत्र लिहिले. मूकनायकमुळे त्यावेळच्या अस्पृश्य, बहिष्कृत समाजाला नवी उमेद मिळाली, त्यांना झळाळी आली. त्या पत्रकारितेची आजच्या पत्रकारितेशी तुलना करताना मन खिन्न होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने महाराष्ट्र शासन पत्रकारिता पुरस्कार देते. त्याप्रमाणे मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने पत्रकारितेचा पुरस्कार द्यावा, त्यामुळे पत्रकारितेला नवे वैभव प्राप्त होईल.
– सुनील बैसाणे, धुळे