लंडन (#london) : बहुतांश लोकांना केवळ चारच रक्तगट (blood group) माहिती असतात. त्यामध्ये ए, बी, एबी आणि ओ यांचा समावेश होतो.
मात्र, अन्यही अनेक रक्तगट अस्तित्वात आहेत. वैज्ञानिकांनी अलीकडेच एका नव्या रक्तगटाचा शोध लावला आहे. त्याला
त्यांनी ‘इआर’ (ER) असे नाव दिले आहे. हा रक्तगटाचा ४४ वा ज्ञात प्रकार आहे. हा शोध एखाद्या नव्या ग्रहाचा शोध लावण्याइतका
महत्त्वाचा आहे असे संशोधकांनी म्हटले आहे. रक्तामध्ये होणारे विकार व त्यांच्यावरील उपचार करण्यासाठी हा शोध
महत्त्वाचा ठरेल तसेच रक्ताशी निगडीत अन्यही काही गंभीर आजारांवरील उपचारातही मदत मिळेल असे संशोधकांना
वाटते. विशेषतः नवजात बाळ आणि गर्भात होणार्या आजारांवरील उपचारातही हा शोध महत्त्वाचा ठरू शकतो. वैज्ञानिकांना १९८२ मध्येच ‘इआर’ रक्तगटाचे संकेत मिळाले होते. मात्र, तंत्रज्ञानातील कमतरतेमुळे अनेक दशके या
दिशेने काम होऊ शकले नाही. आता चार दशकांच्या अध्ययनानंतर अखेर हा रक्तगट शोधण्यात यश आले. ब्रिटनमधील संशोधकांनी हा रक्तगट शोधला आहे. ब्रिसल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी म्हटले आहे की रक्ताच्या प्रकाराला लाल रक्तपेशींमधील प्रोटिनच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून निश्चित केले जात असते. कटिंग-एज डीएनए सिक्वेंसिंग आणि जीन एडिटिंग टेक्निकच्या माध्यमातून विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘पिझो १’ नावाच्या प्रोटिनचा शोध लावला. हा ‘इआर’ रक्तगटाचा ‘मार्कर’ आहे. हे प्रोटिन आरोग्य आणि आजारपण या दोन्हींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.