धुळे: गावात ज्या गल्लीत कार्यक्रम असेल त्या गल्लीतून वावरण्यास दलितांना दोन दिवस मज्जाव असतो. दलितांना अतीशय हीन वागणूक दिली जाते. गावगुंडांचा बंदोबस्त केला नाही तर खैरलांजीसारखी (khairlanji) दुर्घटना घडण्याची भिती आहे, असे भयावह गार्हाणे धमाणे गावातील महिलांनी पोलीसांपुढे मांडले.
बहुजन माज पार्टीच्या (# bsp-bahujan samaj parti) नेतृत्वाखाली बुधवारी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड (sp sanjay barkund) यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धमाणे ता. धुळे येथे गावातील सतीश विठ्ठल ठाकरे व त्यांच्यासोबत असलेले शंभर ते दिडशे नागरीक दलित समाजावर अत्याचार करीत आहेत. महिला, पुरुष, तरुण विद्यार्थी यांना मानसिक त्रास देत आहेत. किराणा घेण्यासाठी दुकानावर जाणार्या महिलांना पायातील पादत्राणे डोक्यावर ठेवा, मान खाली करुन चला, असा दम सतीश ठाकरे आणि त्याचे सहकारी देत आहेत. गावात दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. राज्यासह जिल्ह्यात सातत्याने अशा घटना घडत आहेत. खैरलांजी, शिर्डी, खर्डा अशा प्रकारची घटना धमाणे गावातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दलित वस्तीची राखरांगोळी करु, मेहेरगावप्राणे बहिष्कार टाकू, किराणा, चक्की, दूध डेअरी, रिक्षा, शेतातील कामे बंद करु, अशी दमदाटी सातत्याने केली जात आहे. गावात एखादा कार्यक्रम असेल तर त्या परिसरात दलितांना दोन दिवस मज्जाव असतो. अशा प्रकारची हीन वागणूक मिळत आहे. परिणामी भारतीय संविधानामुळे मिळालेले अधिकार, हक्क आणि लोकशाहीपासून धमाणे गावातील दलित वंचित आहेत. त्यामुळे जातीयवादी गावगुंडांचा त्वरीत बंदोबस्त करुन, दलित वस्तीला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना संदेश भूमि समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे, (ananda saindane) बहुजन समाज पार्टीचे (bsp) जिल्हा सचिव विजय भामरे, धुळे शहर विधानसभा सचिव अॅड. सतिष अहिरे, धुळे शहर विधानसभा प्रभारी अॅड. कृष्णा निगडे, विजय मोरे, लक्ष्मण बच्छाव, कृष्णा वेंदे, विजय वेंदे, यांच्यासह गावातील मंगलबाई सुदाम बैसाणे (manglbai baisane), संगीता सुनील बैसाणे, प्रियंका रमेश बैसाणे, सीमा काशिनाथ बैसाणे, जिजाबाई मोहन बैसाणे, सुनीता नंदू बैसाणे, जनाबाई बाबुलाल बैसाणे, निर्मला भटू बैसाणे, उज्वला नाना बैसाणे, सविता अनिल बैसाणे, मिराबाई राजेंद्र ढिवरे, मायाबाई भगवान बाविस्कर, मंगलबाई राजेंद्र बैसाणे, प्रियंका मंगेश बैसाणे, वैशाली साहेबराव बैसाणे, गायत्री शालिक बैसाणे या महिला उपस्थित होत्या.