धुळे (#dhule): तालुक्यातील नेर, कुसुंबा ,देऊर, मोराणे प्र. ल. परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा तातडीने पंचनामा करून प्रस्ताव शासनास पाठवावा अशा सूचना आमदार कुणाल पाटील (mla kunal patil) यांनी दिल्या असून नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विमा कंपनीनेही याबाबत त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची विमा भरपाई देण्याच्या सूचना आ. पाटील यांनी दिल्या आहेत.
30 जानेवारी रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची प्रचंड नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले असून कांदा, हरभरा, तसेच इतर फळ पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महसूल कृषी विभागाने नुकसान झालेल्या भागाचा तातडीने पंचनामा करून प्रस्ताव शासनास सादर करावा. तसेच विमा कंपनीनेही याबाबत त्वरित आढावा घेऊन विमा भरपाई देण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केल्या आहेत. अवकाळीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.