धुळे (#dhule) : महापालिकेच्या (DMC) महापौर पदासाठी भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी (pratibha chaudhari) तर स्थायी समिती सभापती पदासाठी किरण कुलेवार (kiran kulewar), महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी सारिका अग्रवाल व उपसभापती पदासाठी विमलबाई पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले. यामुळे चौघा पदांसाठीची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले असून दि.८ रोजी विशेष महासभेची औपचारिकता ठरणार आहे. मुदतीत विरोधी गटाकडून अर्ज न आल्याने भाजप समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला.
भाजपा नगरसेवक कोकणात
या निवडीत दगाफटका व गटबाजी टाळण्यासाठी भाजप नेत्यांनी सर्व नगरसेवकांना सहलीला पाठविण्याचा निर्णय घेतला. नगरसेवकांना दापोली येथे सहलीवर नेण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही नगरसेवक धुळ्यात दाखल झाले. तर उर्वरित नगरसेवकांचा दापोलीत मुक्काम आहे. चौघा पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत होती. महापौर पदासाठी एमआयएमकडून अर्ज नेण्यात आला होता. परंतु त्यांच्याकडून अर्ज भरण्यात आला नाही. यामुळे विरोधक या निवडीपासून अलिप्त राहिल्याचे दिसत आहे. चौघा पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपाच्या उमेदवारांसह समर्थकांनी एकच जल्लोष केला. चौघा उमेदवारांचा सत्कार करण्यात येवून महापालिका आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
महापालिकेच्या द्वितीय सत्रातील महापौर पदाचा प्रदीप कर्पे (pradip karpe) यांनी राजीनामा दिला. यामुळे उर्वरित कालावधीसाठीच्या महापौर निवडीची प्रक्रिया महापालिकेत राबविण्यात येत आहे. या सोबतच एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठी दि.८ रोजी सकाळी ११ व दुपारी ३ अशा दोन विशेष सभा पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा (jalaj sharma, dm dhule) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
अर्ज दाखल करतेवेळी खा.डॉ.सुभाष भामरे (dr. subhash bhamare) यांच्यासह माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, शहराध्यक्ष मायादेवी परदेशी, भाजप गटनेत्या वालिबेन मंडोरे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, ओमप्रकाश अग्रवाल, विनोद मोराणकर, चंद्रकांत गुजराथी, नगरसेविका कशीश उदासी, भारती माळी, वंदना थोरात, माजी सभापती संजय जाधव, नगरसेवक बन्सीलाल जाधव, शशी मोगलाईकर, सुनील सोनार, अल्पा अग्रवाल, मोहिनी गरुड, प्रवीण अग्रवाल, प्रा.सागर चौधरी, शिवाजी चौधरी, डॉ.महेश घुगरी, संजय बोरसे, हेमंत मराठे, गुड्डू अहिरराव, राकेश कुलेवार, महादेव परदेशी, यशवंत येवलेकर, बबन चौधरी, राजू मराठे, गोपीचंद पाटील यांच्यासह पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते.