इंफाळ (# imphal): मणिपूरमध्ये शनिवारी एका फॅशन शोच्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. या कार्यक्रमात अभिनेत्री सनी लिओन (sunny leone) सहभागी होणार होती. मणिपूरची राजधानी इम्फाळमधील हट्टा कांगजेबुंग भागात हा स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, पण घटनास्थळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर सकाळी ६.३० च्या सुमारास हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला की ग्रेनेडचा वापर करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तसेच अजून तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. विशेष म्हणजे अभिनेत्री सनी लिओनीच्या शोस्टॉपर इव्हेंटच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाने दहशत निर्माण झाली आहे. मैदानाच्या दक्षिणेकडील रस्त्यावरून फेकण्यात आलेला हँडग्रेनेड शोच्या स्टेजजवळ पडला.
पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब हल्ल्यामागील हेतू शोधण्यासाठी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्फोटानंतर पोलीस कमांडोंच्या पथकाने घटनास्थळाच्या आसपास शोध मोहीम सुरू केली. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नाही.
सनी लिओन फॅशन शो करण्यासाठी येणार होती
सनी लिओन ही ४१ वर्षांची कॅनेडियन-अमेरिकन-भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती इंफाळमधील हाऊस ऑफ अली फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करण्यासाठी आणि हट्टा येथे हातमाग- खादी उद्योगाला आणि मणिपूरमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तेथे उपस्थित राहणार होती.