#dhule धुळेः एलआयसी (lic) आणि स्टेट बॅंक आॅफ इंडिया (sbi) या सार्वजनिक वित्तीय संस्थांना अदानी उद्योग समुहात गुंतवणूक करण्यास भाग पाडून सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान करणार्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काॅंग्रेसने (congres) सोमवावारी राज्यव्यापी आंदोलन केले.
धुळे शहरात देखील एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अदानी आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रूपये गुंतवण्यात मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे 29 कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का ? अशी भिती निर्माण झाली आहे. एल. आय. सी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थामध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतू मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये हा पैसा बळजबरीने गुंतवला आहे. म्हणून अदानी उद्योग समुहातील गैरकाराभाची चौकशी व्हावी यासाठी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले.