धुळेः मुंबई-आग्रा राष्ट्रीय महार्गालगत अवधान गाव शिवारात झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम टोल प्रशासनाने हाती घेताच येथील व्यावसायिकांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शविला आहे. शोले स्टाईल आंदोलनानंतर हा वाद अधिकच चिघळला आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी अवधान येथे गुरुवारी एका व्यावसायिकाने मोबाईल टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. लोकप्रतिनिधी, गावकरी, पोलिसांनी समजुत काढण्याचे अथक प्रयत्न केल्यानंतर या व्यावसायिकाने आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. परंतु मोबाईल टाॅवरवर चढलेल्या व्यावसायाकासह ईतरही अतिक्रमणधारकांचा विरोध माञ कायम आहे. आमची दुकाने अतिक्रमित नसून ती रितसर खरेदी केलेली आहेत. खरेदीच्या व्यवहारापोटी शासनाला मुद्रांक शुल्क देखील अदा केले आहे. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. असे असताना टोल प्रशासनाने आम्हाला अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावल्याच कशा, असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, टोल प्रशासनाने देखील सायंकाळी पञकार परिषद घेऊन, आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अवधान शिवारातील अतिक्रमण हटाव मोहिमेला काही नागरिक गुंड प्रतृत्तीच्या नागरिकांना हाताशी धरून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी टीबीआर कंपनीचे संचालक सारांश भावसार यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी धुळे ते ‘पिंपळगावपर्यंत महामार्ग सेवा पुरवण्याचा करार केला आहे. त्या कंपनीकडून टीबीआर कंपनीला काम देण्यात आले आहे. अपघात, आग आणि इतर दुर्घटनांवेळी मदतकार्य राबवत महामार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कंपनीची असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पिंपळगावपासून महामार्गावरील अतिक्रमणे काढली जात आहेत. अलीकडेच टीबीआरच्या माध्यमातून शहरातील गुरुद्दाराजवळील अतिक्रमणे काढण्यात आले होते. पण गुरुवारी सकाळी अवधान हद्दीतील महामार्गावरील अतिक्रमणे काढली जाणार होती. त्यासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तही देण्यात आला होता. परंतु काही नागरिकांनी अतिक्रमण काढायला विरोध केला. पोलिस बंदोबस्त असतानाही अतिक्रमण हटवायला विरोध केला जात असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयल केला जात आहे. तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भावसार यांनी केली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.