#Mumbai मुंबई: अनेक जण मुंबईत येतात तेच मुळात अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी. दिवस रात्र मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. बाहेरून झगमगती दिसणारी ही दुनिया आतून मात्र अगदी निराळी आहे. त्यातही मालिका विश्वात कलाकाराला प्रसिद्धी लगेच मिळते. मात्र त्यासाठीही फार मोठी किंमत मोजावी लागते. मराठीमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (#urmila nimbalkar) हिने टीव्ही इण्डस्ट्रीचं (tv industri) पडद्यामागचं सत्य सांगितलं आहे. उर्मिलाने काही वर्ष मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं. तिने काही चित्रपट आणि सहा- सात मालिका केल्या. मात्र कालांतराने तिने टीव्ही इण्डस्ट्री सोडली आणि आता ती एक यशस्वी युट्यूबर आहे. आपण अभिनय का सोडला यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
मुलाखतीत बोलताना उर्मिला म्हणाली, ‘मी एका मालिकेत काम करत होते. माझ्या असं लक्षात आलं की कागदावर लिगली मी १३ तास लिहितेय, जे खूप जास्त असतात. जेव्हा १३ तास आपण काम करतो तेव्हा फक्त २ ते ३ तास बसलेलो असतो बाकी संपूर्ण वेळ उभे असतो. तसं आम्ही ओढत ओढत १७ ते १८ तास मालिकेचं चित्रीकरण करायचो. हा ट्रेण्ड सगळ्याच मालिकांच्या बाबतीत आहे. त्याला काही एकच प्रोडक्शन हाऊस वाइट आहे, एकच चॅनेल वाइट आहे असं नाही म्हणून शकत. त्यानंतर मला जाणवलं की हे जे चाललंय ते बरोबर नाहीये. माझ्या शरीरावर प्रचंड परिणाम व्हायला सुरूवात झाली. कारण अर्थात तुम्ही शरीराला किती ताणणार? झोप नाही, गोळ्या खायच्या, आजारी पडलं तरी सलाइन लावून परत यायचं, ऍडमिट झालं तरी परत उभं राहायचं. सुट्टी नाही अजिबात, अशा पद्धतीने सुरू होतं.’