kunal patil: एस.टी.कर्मचार्यांचे वेतन निर्धारित वेळेत करा! विधानसभेत विविध प्रश्नांना फोडली वाचा
#mumbai मुंबई: एस.टी.कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळावे तसेच महागाई भत्ता,ग्रॅच्यूईटी देण्यासाठी कोणती उपाय योजना केली? याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित करीत आ.कुणाल पाटील यांनी राज्यातील एस.टी.कर्मचार्यांचे प्रश्न विधानभवनात मांडले. त्यामुळे पुन्हा एकदा एस.टी.कर्मचार्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आ.पाटील यांनी केल्याने कर्मचार्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. अधिवेनशाच्या दुसर्या दिवशी आ.कुणाल पाटील यांनी राज्यातील एस.टी.कर्मचार्यांचा तारांकीत प्रश्न क्र.56565 नुसार उपस्थित केला. तारांकीत प्रश्नात आ.कुणाल पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील एस.टी.कर्मचार्यांना वेतनाची निर्धारित तारीख उलटूनही वेतन होत नाही. प्रत्येक महिन्याच्या 4 ते 10 तारखेदरम्यान नियमित वेतन होणे आवश्यक असते. मात्र निर्धारीत तारीख उलटूनही वेतन होत नसल्याने कर्मचार्यांची आर्थिक घडी विस्कटून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते परिणामी कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून एस.टी.कर्मचार्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 4 ते 10 तारखे दरम्यान वेतन करण्यात यावे. दरम्यान एस.टी.कर्मचार्यांचे पीएफ, ग्रॅच्यूईटी कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करुनही ते ट्रस्टकडे भरण्यात आले नाही,तसेच कर्मचार्यांना मिळणारा 34 टक्के महागाई भत्ताही अद्याप कर्मचार्यांना मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणी शासनाने ताबडतोब चौकशी करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांची सर्व थकीत देयके वेतन विहीत वेळेत अदा करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नातून केली आहे. आ.कुणाल पाटील यांनी एस.टी.कर्मचार्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याने कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.