Dhule, Hailstorm in Nandurbar district, J&K appearance to farmers, heavy loss of crops धुळे, नंदुरबार जिल्ह्यात गारपीट, शेतशिवारांना जम्मू काश्मीरचे स्वरूप, पिकांचे मोठे नुकसान
#Dhule धुळे: नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात तुफान गारपीट झाल्याने शेतशिवारांना जम्मू काश्मीरचे स्वरूप आले होते. निसर्गाच्या या दणक्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर जणू आभाळ कोसळले आहे.
मंगळवारी हवामान खात्याने दिलेल्या अंदानुसार राज्यात २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण होते. त्यातही धुळे जिल्ह्याला मोठ्या गारपिटीचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गहू, केळी, मका, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. होळीच्या दिवशी ६ मार्चच्या दुपारी तीन ते साडे चार वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पन्हाळी पाडा, खोरी, टिटाणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपीटचा अक्षरशः खच साचलेला होता. काढणी झालेली आणि काढणीवर आलेले पीक हातचे गेल्याने, निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा निराश झाला आहे. गहू, कांदा, मका, हरबरा, ज्वारी तसेच पालेभाज्या, फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होळीच्या दिवशी झालेल्या गारपिटीने रंगाचा बेरंग झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले.