आरएसएस प्रणित संघटनांकडून संभ्रम निर्माण केला जातोय, संप कायम, राज्य प्रशासन ठप्प
#DhuleNews धुळे: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारल्याने कार्यालये ओस पडली असून, राज्य प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद होते. दरम्यान, संप कायम असून, आरएसएस प्रणित संघटनांकडून संभ्रम निर्माण केला जातोय, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी दिली.
असा पसरविला संभ्रम
कर्मचारी संघटना आणि राज्य शासन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून दोन दिवसांत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेचे नेते संभाजी थोरात यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली, अशी आवई उठवली आणि संभ्रम निर्माण झाला. परंतु, राज्यातील १७ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. तर धुळे जिल्ह्यात नऊ हजार ५०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाने दबावतंत्राचा अवलंब केला असून, शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसे परिपत्रक जिल्हा प्रशासनाने सोमवारी सायंकाळी काढले.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु, राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. धुळे शहरात मंगळवारी सकाळी भव्य मोर्चा काढून संपाला सुरूवात झाली.