What is Jal Jeevan Mission, Training in Jalgaon District
काय आहे जल जीवन मिशन, जळगाव जिल्ह्यात प्रशिक्षण
jalgaon news भडगाव, जि. जळगाव : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्दर्शन व अर्थसहाय्याने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी महात्वाकांशी जलजीवन मिशन कार्यक्रम राबविला जात आहे.
गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यामध्ये क्षमता बांधणी होण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रविकास अग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर या संस्थेची निवड केली आहे. संस्थेने जल जीवन मिशन अंतर्गत भडगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींमधील ग्रामस्तरीय भागधारकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम भडगाव येथे सुरु केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भडगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहाय्यक गट विकास अधिकारी सैंदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, जल जीवन मिशन हा केवळ पायाभूत सुविधा निर्मितीचा कार्यक्रम नसून, शाश्वत व सक्षम सेवा पुरवठ्याचा आहे. यासाठी गावांनी आपल्या पाणीपुरवठ्याचे स्रोत बळकट करावेत. प्रति व्यक्ती गुणवत्तापूर्ण स्वच्छ व शुद्ध असे ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पुढील ३० वर्षांची लोकसंख्यावाढ विचारात घेऊन पाण्याचा आराखडा गावांनी करावयाचा आहे. जल जीवन मिशनमुळे ग्रामीण जीवनमानात सुधारणा होईल. प्रत्येक कुटुंबांना नळ जोडणीद्वारे शुध्द व निरंतर पाणीपुरवठा होणार आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण जनतेमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाविषयी जनजागृती होऊन नियोजन, अंमलबजावणी, देखभाल दुरुस्ती तसेच लोकसहभाग वाढेल.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग अनिकेत पाटील, समन्वयक सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र महाले, तुषार महाले यांचे मार्गदर्शन मिळत आहे. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक संजय बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, दीपक मोरे, अमोल बैसाणे प्रशिक्षण देत आहेत.