Our children will die by drinking alcohol… Women’s protest for alcoholism!
दारू पिऊन आमची मुलं मरतील… दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार!
#Dhule धुळे: शहरातील देवपूरात बिलाडी रोडवरील जय मल्हार या आदिवासी वस्तीमध्ये गावठी आणि देशी दारूचे अवैध अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, असा आरोप करीत परिसरातील महिलांनी बुधवारी सकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
दारू पिल्यामुळे तरुण पिढी उध्वस्त होत असून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. दारू पिल्यामुळे आमची मुले एक दिवशी मरतील अशी भीती व्यक्त करीत या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बिलाडी रोड परिसरात सुरू असलेले दारूचे अवैध अड्डे त्वरित बंद करावेत, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्वरित दारूबंदी केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशाराही या परिसरातील महिला आणि काही तरुणांनी दिला. तसेच दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी ही प्रमुख मागणी निवेदनात केली आहे.
या परिसरात दारूचे अड्डे असल्याने लहान मुले आणि तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. तसेच या अड्ड्यांवर दारू पिण्यासाठी येणारे गुंड प्रवृत्तीचे मद्यपी लोक महिलांची छेडखानी करतात आणि अरेरावीची भाषा करतात, असा गंभीर आरोपही यावेळी महिलांनी केला.
निवेदन देताना आशाबाई अहिरे, रमाबाई नेमाडे, ताईबाई, जिजाबाई वसावे, आनंद सोनवणे, राकेश जाधव, शालिक सोनवणे, सुशीला सोनवणे, नंदाबाई ठाकरे, सुदाम ठाकरे, मिराबाई पवार, मंगल मोरे, सुमनबाई ठाकरे, नरेश सोनवणे, जितू ठाकरे, आनंद अहिरे, भरत सोनवणे, रोहित मोरे, रवी वाघमारे, सरलाबाई अहिरे, कृष्णा ठाकरे, नाना अहिरे, आनंद अहिरे, शिवाजी सोनवणे, रावण ठाकरे, अशोक गवळे, बळीराम सोनवणे आदी उपस्थित होते.