How to survive a lightning strike विजा चमकताना झाडाखाली का थांबू नये? झाडाला बांधलेल्या म्हशीचा वीज पडल्याने मृत्यू
lightning storm धुळे : शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे १५ मार्चला सायंकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. त्यात भडणे येथील शेतकरी रामसिंग वाघ यांच्या शेतात झाडावर वीज कोसळली. या झाडाला बांधलेल्या दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. शेतकरी रामसिंग वाघ यांचे मोठ्या नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेत म्हशीचा मृत्यू झाला. आपण तर माणसं आहोत. म्हणून आकाशात विजा चमकत असतील तर झाडाखाली अजिबात थांबू नये.
- झाडावर वीज का कोसळते?
जमिनीवर आभाळाच्या खाली विरुद्ध भार म्हणजे धन भार तयार होतो. हवा ही विद्युत रोधक असते, पण जेव्हा भार वाढत जातो तेव्हा हवेचे आयोनायझेशन होऊन ती विद्युत वाहक होते. दोन्ही भार एकमेकाकडे आकर्षित होतात आणि सर्वात जवळचा चांगला वाहक पाहून त्याठिकाणी वीज पडते. वीज कुठे पडणार हे जमिनीपासून काही फुटाच्या अंतरावर ठरते. झाड उंच असल्याने जवळचा वाहक आहे. म्हणून आकाशातून पडणारी वीज झाडावर कोसळण्याची शक्यता अधिक असते.
- वीज कशी तयार होते?
पावसाळ्याच्या सुरूवातीला उन्हाळ्यात जमिनीजवळची तापलेली गरम हवा आकाशात वर वर जाते. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार-गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. अधिक घनभार (Positive Charge) हा ढगांच्या वरच्या बाजूला ओढला जातो किंवा तयार होतो व ऋणभार (Negative Charge) हा ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो किंवा खालच्या बाजूला तयार होतो. जसे जसे हे घनभारित व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहू लागतात, तसे तसे जमीन व त्यावरील झाडे व उंच इमारती यांच्यात घनभार (Positive Charge) तयार होतो. हा भारांचा फरक (Differance Between the charges) वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो. (Electrical current begins to move) विद्युत प्रवाह (Electrical current) हा वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो. (When it completes the circuit it releases the Energy in the form of light) तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रुपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.
वीजेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं एक पत्रक जारी केलं आहे. त्यात वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती दिली आहे.
- काय काळजी घ्यावी?
सुरुवातीला तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं आणि काय करायचं नाही हे पाहूया. विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो. सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही, तर उंचीच्या जागांखाली आश्रय घेणं टाळा. जसं की टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं. कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेउन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीतकमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या. कार्यालयं, दुकानं, यांची दारं-खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा. विजा चमकत असतांना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झिणझिण्या आल्यास, तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा. धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा. धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा. टेलिफोन किंवा वीजेच्या खांबांखाली थांबू नका. ते विजेला आकर्षित करतात. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका. जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. सायकल, मोटरसायकल, उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा.
- घरात असल्यास घ्यायची खबरदारी
आता तुम्ही घरात असाल तर काय करायचं आणि काय नाही हे पाहूया… हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी (जनावरांना चारणे, मासेमारीसाठी) बाहेर पडू नका. घरातचं थांबा आणि प्रवास टाळा. घराच्या खिडक्या, दारं यापासून लांब राहा. धातूच्या वस्तूंचा वापर करू नका. विजा चमकत असताना हेयरड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझरसारखी विद्युत उपकरणे चालू करू नका. कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला वीजेचा धक्का बसू शकतो. टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरांवरील तारांमधून वाहू शकते. मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या. वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ- आंघोळ, भांडी धुणं वगैरे. कारण वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा.
- वीज पडल्यानंतर काय करायचं?
एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता. असा स्पर्श करणं सुरक्षित असतं.यासाठी बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके पडताहेत ना ते अगोदर तपासून पाहा.
जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या.
हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डिआक कॉम्प्रेशनचा वापर करा.
अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहा.
गरज पडल्यास संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा.