As a result of the strike, contract recruitment of 144 posts including 121 nurses in Here Hospital
संपाचा परिणाम, हिरे रुग्णालयात १२१ परिचारिकांसह १४४ पदांची कंत्राटी भरती
Dhule News धुळे: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला असून, हिरे रुग्णालय प्रशासनाने १४४ पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात १२१ अधिपरिचारिकांचा समावेश आहे. ही भरती तात्पुरती आणि बाह्य स्रोतांद्वारे होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अधिनस्त सर्वोपचार रुग्णालयाने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.
संप कालावधीकरिता रिक्त मंजूर पदांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पदभरतीची walk in interview जाहिरात nic पोर्टलवर प्रसिद्ध करावी, अशी शिफारस पत्रात केली आहे.
तसेच ही भरती फक्त संप काळापुरती मर्यादित कालावधीसाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून, संप मिटताच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कंत्राटी सेवा आपोआप संपुष्टात येईल, असे पत्रात नमूद केले आहे. उमेदवारांकडून तसे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.
पदाचे नाव, पदसंख्या अशी
- हिरे महाविद्यालय
- क्ष किरण तंत्रज्ञ १
- रक्तपेढी तंत्रज्ञ २
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५
- प्रयोगशाळा सहायक १०
- सर्वोपचार रुग्णालय
- अधिपरिचारिका १२१
- क्ष किरण तंत्रज्ञ ३
- ईसीजी तंत्रज्ञ १
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ १