Why does it hailstorm in summer? ऐन उन्हाळ्यात गारा का पडतात?
सन २०२३ मध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, सहा तारखेला होळीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी बेमौसमी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यातही वादळी पाऊस पडला. साक्री तालुक्यातील खोरी टिटाणे परिसरात जोरदार गारपीट झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. पुन्हा १७ तारखेला साक्री तालुक्यात गारपीट होऊन उरलीसुरली पिके उध्वस्त झाली. ऐन उन्हाळ्यात गारा का पडतात हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण, पावसाळ्यात गारपीट होणे काही विशेष नाही. पण, उन्हाळ्यात गारपीट होण्याचे प्रमाण का वाढले आहे? यामागची कारणे काय?
सन २०१४ साली मार्च महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट झाली. २०१५ मध्येही तेच घडले. राज्याच्या अनेक भागात इतकी गारपीट झाली होती की गारांचा थर साचला होता. या गारपिटीबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे आता गारपीट झाली तरी त्याचे काही विशेष वाटत नाही. गारपीट होणे हे महाराष्ट्रासाठी नवे नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच गारपीट होते. यामुळे शेतीचे नुकसान होते. पण आता मार्च महिन्यामध्ये हे घडणे म्हणजे निसर्गाचा असमतोलच म्हणावा लागेल. हवामान अभ्यासकांनी गारेचं विश्व उलगडले आहे.
- गारा पडण्याची शास्त्रीय कारणे
हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे झाले तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी म्हणजे या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त हवे. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते. बाष्पाचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात ते वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. विशेष म्हणजे ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडे सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.
- अशी होते गारांची निर्मिती
गारांचे विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणे, खाली पडणे सारे काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात. हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठे, अधिक मोठे करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात. हे पापुद्रे का तयार होतात? तर, गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसे होण्यासाठी हवामानात अनेक उलथापालथ घडतात. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथे त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडते, तेव्हाच गारा बनतात.
- ढगांमध्ये नेमके काय घडते?
प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो. गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो तो दोन गोष्टींवर, गारेचे वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचे वजन वाढले की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचे वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचे वजन वाऱ्यावर मात करते, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार ठरतो.
- तापमानाचा सामना करावा लागतो
एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. जमिनीकडे येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतेही तसेच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचे हेच रहस्य असते. ही सगळी दिव्ये पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठे कुतूहल असे की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणे असतील, पण त्यापैकी मुख्य दोन कारणे आहेत. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेले असते. दुसरे म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळेसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो.
– ॲड. तुकाराम मासुळे, Dhule (लेखक हे भूगोल विषयाचे प्राध्यापक होते.)