Farooq Shah announced in the assembly, an inquiry into the crime in Dhula under the chairmanship of the IG
फारूख शहांनी विधानसभा गाजवली, धुळ्यातील गुन्हेगारीची आयजींच्या अध्यक्षतेखाली चौकशी
Mumbai/धुळे : शहरातील गुन्हेगारीच्या प्रश्नांवर विधानभवनाच्या पायरीवर बसून उपोषण करीत आमदार डॉ. फारुख शाह यांनी विधानसभा गाजवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांच्या उपोषणावर चर्चा घडवून आणली आणि धुळे शहरातील गुन्हेगारीच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी आयजींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागले.
पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमदार फारुख शाह यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार फारुक शहा यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. धुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झालेला असून पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक दिसून येत नाही. म्हणून आमदार फारुक शहर हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसलेले आहेत. तरी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण तातडीने करण्यात यावे आणि सरकारच्यावतीने जबाबदार प्रतिनिधी पाठवून आ. फारुख शाह यांचे उपोषण सोडण्यास विनंती करावी. विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. नामदार फडणवीस म्हणाले की, आमदार फारुक शाह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत आय. जी. दर्जाचा अधिकारी नेमून सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच जबाबदार लोकांवर सक्त कार्यवाही करण्यात येईल.
त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी आमदार फारुख शाह यांची उपोषणस्थळी भेट घेवून त्यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आमदारांनी सर्वांच्या विनंतीचा मान राखत उपोषण मागे घेतले. उपोषणास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार रईस शेख, आमदार बच्चू कडू, आमदार प्राजक्त तनपुरे, विश्वजित कदम, निलेश लंके, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली.
या आहेत प्रमुख मागण्या
१) ८० फुटीरोड व वडजाई रोड कॉर्नर हे संवेदनशील असल्यामुळे तेथे तत्काळ पोलीस चौकी उभारण्यात यावी.
२) शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेले ‘दादा’ ‘भाई’ सारखे गुंडांचे अड्डे उध्वस्त करणेकामी विशेष मोहीम राबविण्यात यावी.व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी .
३) शहरात झालेल्या चोऱ्या व घरफोड्या यांची उकल करणेकामी एक विशेष पथक स्थापन करून पेंडींग चोऱ्या घरफोड्या उघडकीस आणण्यात याव्या.
४) धुळे जिल्हा पोलीस.अधिक्षक संजय बारकुंड यांचेकडे लेखीपत्रांद्वारे अनेकवेळा माहीती मागितली असता त्यांनी कुठलाच प्रतिसाद न देता तसेच मागितलेली माहीती न देता कुठल्याही प्रकारचे उत्तर सुद्धा दिलेले नाही. त्यांनी एक प्रकारे लोकप्रतिनिधी यांच्या हक्क व अधिकारावर गदा आणलेली आहे तसेच त्यांनी आपल्या कामात हयगय व कर्तव्यात कसूर केलेला आहे. तरी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी
५) धुळे शहरात चोऱ्या,घरफोड्या, चैन स्नॅचिंग,सट्टा पिढ्या, रनिंग मटका, झन्ना मन्ना, जुगार यासारख्या अनेक गंभीर-स्वरूपाचे गुन्हेगारीला अभय देणाऱ्या व आर्थिक मलिदा लाटणाऱ्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची ACB किवा खातेनिहाय चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी.
६) शहरात अनेक ठिकाणी नशेच्या गोळ्या व औषधांची सर्रासपणे विक्री केली जाते. त्यामुळे तरुण पिढी नशेच्या विळख्यात जात आहे. विशेषत: आझाद नगर व ४० गावं रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नशेच्या गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या प्रमुख सुत्रधारांवर मोक्का / MPDA कायद्यानुसार त्वरित कारवाई करण्यात यावी.
७) धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत राजस्थानहून तलवारी आणून विकणाऱ्या व देशी कट्टे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध विशेष पथकामार्फत तीव्र स्वरुपाची कारवाई करण्यात यावी.