The manager of the garbage contractor was beaten up by NCP workers
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कचरा ठेकेदाराच्या मॅनेजरला मारहाण
Dhule News धुळे : शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कचरा ठेकेदाराच्या मॅनेजरवर शाई फेकून त्याला मारहाण केली. धुळे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतींमध्ये घडलेल्या या मारहाणीचा video व्हायरल झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आंदोलन देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी धुळे महानगरपालिकेच्या आवारात कचरा ठेकेदाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी धुळे महानगरपालिकेने स्वयंभू कंपनीला दिली आहे.
परंतू शहरातील बहूतांश भागामध्ये कचरा हा रस्त्यांवर पडलेला असतो. शहरामध्ये विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. स्वयंभू कंपनीकडून वेळेवर कचरा संकलन न झाल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कॉलनी, परिसरामध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. नागरिकांनी तक्रारी नोंदविल्यावर त्याची दखल सुध्दा घेतली जात नाही. घंटागाडीवर कार्यरत कर्मचारी घंटागाडीमध्ये वजन वाढविण्यासाठी माती, रेती, दगड भरुन त्याचे वजन करुन चूकीचे मोजमाप नोंदवून बिले मंजूर करुन घेतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे. सदर कचरा ठेकेदाराचा मनमानी पध्दतीने कारभार सुरू आहे, असे एक ना अनेक आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या आंदोलकांना स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर अभिजीत फडतरे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप आहे. धुळेकर जनताच घाण करते, धुळेकरांना शिस्त नाही, असे बोलल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकले. त्यामुळे आंदोलन चिघळले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या मॅनेजरच्या तोंडाला काळे फासले. धुळेकर जनतेचा अपमान राष्ट्रवादी कार्यकर्ते सहन करणार नाही. धुळ्यात येवून पैसे कमवायचे आणि धुळ्याच्या लोकांना नाव ठेवायचे असे चालणार नाही असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी सांगितले. सदर कचरा ठेकेदार यांना योग्य समज देण्यात यावी. किंवा कचरा ठेकेदार त्वरीत बदलून त्या जागी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अभिजीत फरताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.