A fire broke out and the control room received a satellite signal
वणवा पेटला अन् कंट्रोल रूमला सॅटेलाईट सिग्नल मिळाला, जंगल वाचले!
Dhule धुळे: तालुक्यातील तिखी शिवारात शुक्रवारी रात्री वणवा पेटला होता. सुदैवाने वन विभागाच्या तत्परतेमुळे तसेच अत्याधुनिक यंत्रणेमुळे वणवा आटोक्यात आला आणि जंगल जळण्यापासून वाचले.
शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास वणवा पेटला. उपग्रहीय तंत्रज्ञानाद्वारे नागपूरच्या कंट्रोल रूमला सिग्नल मिळाला. धुळ्यातील वन अधिकारींच्या मोबाईलवर संदेश मिळाला. ही संपूर्ण स्वयंचलित प्रक्रिया अवघ्या पाच मिनिटांत घडली. वन कर्मचारी त्वरीत वणव्याच्या ठिकाणी पोहोचले. अत्याधुनिक दोन ब्लर यंत्राद्वारे साडेनऊ वाजेपर्यंत वणवा आटोक्यात आला.
पाच हेक्टर क्षेत्रावर नुकसान
पाच हेक्टर क्षेत्रावर हा वणवा पेटला होता. सुदैवाने वन्यजीवांना कोणतीही हानी झाली नाही. मुळात खडकाळ प्रदेशात वणवा पेटल्याने फार नुकसान झाले नाही. केवळ गवत जळाले आहे. पोलिसांच्या फायर बटचा हा निर्जन परिसर आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाच्या पूर्वेकडील तिखी बीटमधल्या आसाण्या डोंगरालगत हा वणवा पेटला होता. धुळे वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील, वनरक्षक व्ही. के. हेगळे, कुसूंब्याचे वनरक्षक डी. के. निकम, वनपाल एन. बी. आखाडे, नाना ठाकरे, गोरख पवार, अंबरनाथ पवार यांच्यासह वन कर्मचारी वणवास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ लळींग गावातून म्हसू सोनवणे, आप्पा पवार, भुरा सोनवणे, गोरख सोनवणे, प्रविण सोनवणे, दिलिप मोरे यांच्यासह ३५ ते ४० गावकरी मदतीला धावून आले.