Tehsildars work stopped, revenue work stopped across the state
तहसीलदारांचे काम बंद, राज्यभर महसूलचे काम ठप्प
Dhule धुळे: दर्जा वर्ग दोनचा, मग वेतन श्रेणी वर्ग तीनची का, असा प्रश्न उपस्थित करत ४८०० रुपये वेतन श्रेणी द्यावी या मागणीसाठी नायब तहसीलदारांसह राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे महसूलचे काम ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने ४८०० रुपये ग्रेड पे देण्याच्या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलनाची नोटीस शासनाला यापूर्वीही दिली होती. परंतु शासनाच्या महसूल प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने राजपत्रित अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय काम बंद आंदोलन सुरू केले असून, यामुळे महसूलच्या नियमित कामांवर परिणाम झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील अधिकारी धुळे शहरात क्युमाईन क्लबजवळ आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, शिरपूरचे प्रांत अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार गायत्री सैंदाणे, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश घोलप, उपाध्यक्ष आशा गांगुर्डे, सचिव अविनाश सोनकांबळे, कोषाध्यक्ष पंकज पाटील, कार्याध्यक्ष शारदा बागले, संघटक ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी झाले आहेत.