Stamp sellers and autograph writers gathered from the state warned of an indefinite strike
राज्यातून एकवटलेल्या मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांनी दिला बेमुदत बंदचा इशारा
Dhule News धुळे: मुद्रांक विक्रेता व दस्तलेखकांचा राज्यस्तरीय मेळावा धुळे येथे शनिवारी झाला. अध्यक्षस्थानी नंदुरबारचे ज्येष्ठ मुद्रांक विक्रेते भिका चौधरी होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील मयत झालेले मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्याचे आयोजक माजी नगरसेवक दिलीप देवरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेता व्यवसाय सुरु आहे. १०० वर्षांमध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. परंतु गेल्या १०-१५ वर्षापासून शासनाने आम्हास अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात मेळाव्यात अनेक विषयांवर बोलतांना सांगितले की, राज्य शासनाने छपाई केलेले हजारो कोटींचे स्टॅम्प महाराष्ट्राच्या ट्रेझरीमध्ये शिल्लक पडलेले आहेत. सदर स्टॅम्प मुद्रांक विक्रेत्यांना उपलब्ध करुन द्यावेत, ५०० च्या पुढील सर्व स्टॅम्प विक्रीकरीता देण्यात यावेत, मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस वारसा हक्काने परवाना मिळावा, मुद्रांक विक्रेत्यांना बसण्यासाठी शासनाने जागेची व्यवस्था करावी, मुद्रांक विक्रेत्यांना मदतनीस ठेवण्याची परवानगी मिळावी, शासनाने गेल्याच महिन्यात ३० हजार रुपयांच्या विक्रीची मर्यादा १० हजार रुपयांवर केली, ती पूर्ववत करण्यात यावी, स्टॅम्प विक्रीवर देण्यात येणारी मनुती ५ टक्के करावी आदी मागण्या त्यांनी मांडल्या. मुद्रांक विक्रेता हा शासनास दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसुल देतो. तरी देखील आमच्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर, महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी दिलीप देवरे, भिका चौधरी, अशोक कदम, शंकर यादव यांनी मार्गदर्शन केले. तसेच मोहन वाघ, अलका देशमुख, विनोद देशमुख, वैशाली हिंगमिरे, दीपक सरवटे, नितीन गांधी, राजेश कुलकर्णी, वासुदेव चव्हाण, सुभाष देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मुद्रांक व दस्तलेखक उपस्थित होते. सुत्रसंचालन मुद्रांक विक्रेता भालचंद्र भांडारकर यांनी केले. वासुदेव चव्हाण यांनी आभार मानले.