The police arrested the couple after they met in private
एकांतात भेटलेल्या तरुण-तरूणीची तोडीपानी करणे भोवले, पोलिसांनी दोघांना पकडले
Dhule Crime धुळे : गप्पा मारण्यासाठी एकांतात भेटलेल्या तरुण-तरूणीची तोडीपानी करणे दोन जणांच्या चांगलेच अंगाशी आले. पोलिसांनी त्यांना पकडून लाॅकअपचा रस्ता दाखवलाय.
शहरापासून जवळच मोराणे गावापासून गोंदूर गावाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकांतात भेटले. त्याचवेळी बाईकवर आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि दोघांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून नेले. ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला घडलेल्या या घटनेप्रकरणी चारुदत्त अनिल जोशी या विद्यार्थ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तेव्हापासून पश्चिम देवपूर पोलीस त्या लुटारू तरूणांच्या शोधात होते. चारुदत्तने सांगितलेले संशयितांचे वर्णन आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करीत पोलिसांनी आनंदखेडे येथून देवेंद्र एकनाथ भील आणि आर्वी येथून अजय रुपा सोनवणे या दोन संशयितांना अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून दोन मोबाईलसह चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एम. एच सय्यद, प्रवीण अमृतकर, किरण जगताप, पुरुषोत्तम सोनवणे, धर्मेंद्र मोहिते, सुनील राठोड, निलेश हलोरे,रवींद्र हिरे यांनी सदरची कारवाई केली आहे.
पोलिसांचे आवाहन
एकांतात फिरणाऱ्यांना हेरून लुटारूंचे फावते. त्यामुळे फिरायला जाताना नागरिकांनी दक्षता घ्यावी. गुन्हा घडल्यानंतर न घाबरता ११२ क्रमांकावर कॉल करावा किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.