Greet Krantisurya with social awareness programs!
समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमांनी क्रांतीसुर्याला अभिवादन!
Dhule धुळे : महिलांचे उध्दारकर्ते, थोर समाजसुधारक तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसूर्याला अभिवादन करण्यासाठी समाजप्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल होती. धुळे शहरात महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दिवसभर जनसागर उसळला होता.
संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे ज्येष्ठ समाजसेवक हरिश्चंद्र लोंढे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रशासनातर्फे जयंतीनिमित्त विविध उपक्रम महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी धुळे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगांवर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, “मी सावित्रीबाई बोलतेय”, “मी ज्योतीबा बोलतोय” या विषयांवर आयोजित एकांकिका स्पर्धांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते समता रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश महाजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन, समाजकल्याण विभागातील सर्व कर्मचारी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. समता रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे येथील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. सदर समता रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात येऊन धुळे शहरातील जिल्हा न्यायालयाजवळील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. त्याठिकाणी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पणाचा कार्यक्रम झाला.
सकाळी ११ वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, धुळे येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. अनिल बैसाणे यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रबोधनपर व्याख्यानाचे पुष्प गुंफले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., राकेश महाजन, प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख व कर्मचारी त्याचप्रमाणे समाजकल्याण कार्यालय व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादुत उपस्थित होते.
सायंकाळी ५ वाजता एस. एस. व्ही. पी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याला उजाळा देणाऱ्या गीतगायनाचा कार्यक्रम झाला.