स्त्री उध्दारक महात्मा ज्योतीबा फुले
‘‘विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली,
नीतीविना गति गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’’
शेतकरी-कष्टकरी, कामगार, दलित, शोषित, पीडित, आर्थिक दुर्बल यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे मुळ शोधण्याचे अचुक काम महात्मा ज्योतीराव फुले यांनी केले. त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्याचा आसूड (१८८३) मध्ये प्रारंभी सांगितला आहे. त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा भावार्थ यात आला आहे. आज ११ एप्रिल रोजी त्यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्त्री कल्याणकारी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
महात्मा फुले भारतीय इतिहासातले आद्य समाज क्रांतिकारक. आपले विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे ते बंडखोर युगपुरुष होते. आपली वैचारिक मांडणी आणि कृतीतून त्यांनी अनेक आघाड्यांवर लढा दिला. जाती प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष सत्यशोधनावर आधारलेला होता. परंतु आजच्या काळातील बहुसंख्य स्त्रीया या धार्मिक कर्मकांडावर विश्वास ठेवतात.
धर्माचा अवडंबर माजवलेल्या कुणा कथाकार बाबाने सिहोर येथे रुद्राक्ष वितरण सोहळा आयोजित केला. यात भाविकांनी सात ते आठ किलोमीटर लांब रांगा लावल्या. दोन दिवस अन्न-पाण्यावाचून ताटकळत राहिले. शिवाय रुद्राक्ष मिळवण्यासाठी चेंगरा-चेंगरीत शेकडो भाविक जखमी झालेत. हा प्रकार अंधश्रध्देपोटी घडला. एका रुद्राक्षने आपल्या जीवनातील दु:ख, संकटे, शारीरिक आजार नाहीसे होतील हि निव्वळ अंधश्रध्दा आहे. परंतु या सत्याचा शोध घेण्याची तसदी एकाही महिलेने घेतली नाही. वास्तविक रांगेत उभे राहणाऱ्या महिला या शिकलेल्या आहेत. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळच मुळात या महिलांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. किंबहुना पुरोगामी चळवळींचे अपयश अधोरेखित करणारी ही घटना म्हणावी लागेल. रुद्राक्ष घेणाऱ्या महिलांनी वाचन केले असते तर आज अनेक महिलांचे धार्मिक, मानसिक आजार दूर झाले असते.
सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातला ‘स्त्री आणि पुरुष’ हा संवाद महात्मा फुलेंची विचारधारा सांगणारा आहे. या पुस्तकात उच्च-नीच उतरंडीचा विरोध करणारी, श्रमिकांना सन्मान देणारी, लोकशाहीपूरक आणि शोषणविरोधी मूल्ये आपल्या विशिष्ट शैलीत मांडली आहेत. स्त्रियांचा विशेषत्वाने केलेला उल्लेख हे या मांडणीचे अजून एक वैशिष्ट्य! स्त्री-पुरुष समानतेचे महत्व आग्रहाने मांडले आहे. मुकेपणाने सोसणाऱ्या स्त्रियांच्या हाती घराचा, समाजाचा आणि राज्याचा कारभार द्यायचा झाला तर त्यांना आपल्याला काय हवे, काय नको हे बोलण्याचे बळ आणि निर्भयता हवी. अलीकडे राजकारणात स्त्रीयांना महापौर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य, विविध आयोगाच्या अध्यक्ष बनताना आपण हमखास पाहतो. परंतु स्त्रीयांना स्वत: निर्णय घेण्याचे स्वातंत्र कुठे दिसत नाही. बोटावर मोजण्याइतक्याच स्त्रिया स्वत:चे निर्णय स्वत: घेतांना दिसतात. त्या स्त्रियांवर महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा दिसून येतो. आज शतकानंतरही तळागाळातील स्त्रियांचे जगणे अपार कष्ट सोसण्यातच जाते.
अज्ञानग्रस्त शूद्र, अतिशूद्र जसे ब्राह्मणादी वरिष्ठ वर्गाच्या दास्यात खितपत पडले आहेत. त्याचप्रमाणे स्त्री जातदेखील पुरूष वर्गाच्या दास्यात युगानुयुगे खितपत पडली आहे. बहुजन समाजाला, अस्पृश्यांना आणि त्यातही प्रामुख्याने स्त्रियांना शिक्षण द्यावे असा आग्रह त्यांनी केला. हे लक्षात घेऊन ज्योतीरावांनी मुलींसाठी एक शाळा काढली. त्यांच्या पत्नी सावित्रीमाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन ज्योतीराव व सावित्रीमाई यांची समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी दोन शाळा काढल्या. त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाजसुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. १८५२ मध्ये सरकारी विद्या खात्याकडून मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतीरावांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. असे असले तरी ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी होता. जातिभेदाची आणि रूढींची बंधने अंधश्रद्धेने पाळीत होता. सुधारकांना स्वतःचे कुटुंब, स्वतःची जात-जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाळीत टाकीत. जातीबहिष्काराचे असहाय असे दडपण क्रियावान सुधारकांना सोसावे लागले; जिवलग नातेवाईकांचाही विरोध होत असे.
त्यावेळचे सर्वच भारतीय समाजसुधारक हे स्त्रियांची दास्यातून आणि दुःस्थितीतून सोडवणूक करण्याकरता प्रयत्नशील झाले होते. हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवा विवाह निषिद्ध मानला होता. बालपणी आणि वारंवार उद्भवणाऱ्या प्राणघातक साथींच्या रोगांमुळे पतिनिधन होऊन तरूणपणीच वैधव्य आलेल्यांची संख्या मोठी होती. केशवपन केल्याशिवाय विधवा ही अपवित्र मानली जात होती. अशा स्त्रीयांवर समाजाची आणि कुटुंबाची करडी नजर असे.
बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरिता पुनर्विवाहाची चळवळ सुधारकांनी सुरू केली. या चळवळीला ज्योतीरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता. तारुण्यकाली स्वाभाविकपणे वासनेला बळी पडलेल्या विधवांची फार विटंबना होत होती. गर्भपाताचे प्रयत्न होत. जन्मलेल्या बालकांची हत्याही केली जाई. त्यांना संरक्षण देण्यासाठी फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहात अशा स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय केली होती. विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता न्हाव्यांचा संपही घडवून आणला. हा संप ऐतिहासिक असा होता. आजच्या स्त्रीला आधुनिक व स्वावलंबी बनविण्याच्या प्रक्रियेचे श्रेय हे महात्मा फुले यांना जाते. त्यांनीच स्त्रीयांचा उध्दाराचा पाया रचला. अशा या थोर समाजसुधारक महापुरुषाला जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवान!
लेखिका : सीमाताई मराठे
मो. 9028557718
स्री उद्धारक महात्मा फुले लेख लिहिणाऱ्या सिमाताई मराठे आणि No 1 Maharashtra Channel चे अभिनंदन !
अविनाश पाटील,
अध्यक्ष, महा अंनिस.