In the field of irrigation and power generation Contribution of Dr. Babasaheb Ambedkar
जल तज्ज्ञ, वीज तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सैन्यात नोकरीला असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करून आलेल्या दोन निष्पाप, निरागस, अजाण, लहान मुलांना नजीकच्या काही अंतरावर असलेल्या गावी पोहचवण्यासाठी गाडी वानाने बैलगाडीत बसवून प्रवास सुरू केला.
ती मुलं कोण्या अस्पृश्याची असल्याचे कळताच त्या गाडीवानाने भलतीच अपमान जनक वागणूक दिली. माझी बैलगाडी विटाळली! असे सांगत त्याने जबरदस्त जळफळाट केला. तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवतो.मात्र बैलगाडी तुम्हालाच हाकावी लागेल. कारण ती विटाळली आहे.मी ती आता चालवू शकत नाही.मी पायी चालत येतो सोबत वाट दाखवायला. चाबकाच्या एखाद्या सनानत्या फटक्याने वळ उठावा तसा या मुलांच्या मनावर मोठा तीक्ष्ण घाव या घटनेने झाला.
याचवेळेस डोक्यावर सूर्य उन्हाची आग ओकत असताना घशाला तहानेने खूप व्याकुळ व्हायला लागले. रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतातली एक विहीर त्यातील एका मुलाला दिसताच गाडीवरून उडी टाकत त्या दिशेने धावायला लागताच गाडीवाल्याने त्याला खबरदार केले की, ती विहीर स्पृश्य माणसाची आहे.एक थेंब पाण्याचा जरी घशात टाकला तरी त्या पाण्यातच बुडवून जीवन संपवतील ही माणसं!! गाडीवान त्या काळची सत्य परिस्थिती बोलत होता. त्याच्या या बोलण्यातून दुसरा घाव त्या दोघातील एका मुलाच्या मनावर कधीही भरून न निघणाऱ्या जखमेसारखा उमटला. तो मुलगा म्हणजे भीमराव रामजी सपकाळ!
स्पृश्य-अस्पृश्य भेदाचे जे विषारी तन माजले आहे, उपटून फेकलेच पाहिजे. त्यासाठी नव्या पिकाची लागवड करावयास हवी!अशा संकल्पाचा अंकुर त्या गोंडस, चुणचुनीत मुलाच्या मनात बैलगाडीवानाच्या कठोर, अपमानजनक बोलण्यामुळे रुजला!
या तेजस्वी मुलाने अगदी छोट्याशा खोलीत राहणाऱ्या अनेक जणांच्या गर्दीत व ओट्यावर बकऱ्या-कोंबड्यांचा त्रासदायक कलकलाटाला सोसून चिमणीच्या उजेडात प्रकाश आणि अक्षरांचा खेळ एवढ्या एकाग्रतेने खेळला की तो येणाऱ्या काळात महान ज्ञानसूर्य म्हणून भारतीभूमीला प्रकाशित करणारा ठरला!
हा मुलगा कधी साताऱ्याच्या बस स्टॅन्डवर हमाली करताना दिसला तर कधी गुरे ढोरे चारवत चारवत पुस्तके वाचण्याचे काम करताना दिसला. उपेक्षितांच्या वस्तीतल्या याच मुलाने त्या काळी कठीणातील कठीण मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या ज्ञानाच्या सुगंधीत लहरी पसरवल्या. हा मुलगा शिकला. प्रचंड शिकला. ज्ञानाच्या तहानेने कासावीस होऊन त्याने अक्षरशः विद्येचा सागर प्राशन केला.
त्या काळच्या नामांकित कोलंबिया विश्व विद्यालयात त्याने अर्थशास्त्र विषयात डिलीटची पदवी घेतली. तर लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या विषयावर मोठा शोध प्रबंध सादर करून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली.
याच काळात एक मोठा स्वातंत्र्यलढा भारत देशात सुरू होता. हा स्वातंत्र्यलढा म्हणजे इंग्रज जो राज्यकारभार करीत होते त्या राज्यकारभारात भारतीयांना सुद्धा सहभागी करून घ्यावे, या मागणीसाठी होता. नंतरच्या काळात परकीय इंग्रजांनी हा भारत देश सोडून निघून जाणे व सत्तेची सूत्रे भारतीयांच्या हातात सोपवावीत, अशा स्वरूपाचा या लढ्याने आकार घेतला.
देशाची सूत्रे जेंव्हा हातात घेऊ तेव्हा शेकडो भाषा, हजारो जाती, अनेक संस्कृती, शेकडो परंपरा, शेकडो चालीरीती व नव्वद टक्के निरक्षर नागरिक असलेल्या या देशाला चालवावे कसे? या देशाचा कारभार करावा कसा? या बाबत मात्र स्वातंत्र्य लढा लढणाऱ्या सेनानींना खूप चिंता सतवायला लागली होती!
स्वातंत्र्य लढा लढणे हा एक वेगळा भाग आहे आणि एका मोठ्या भिन्न-भिन्न संस्कृती, परंपरा असलेल्या व शेकडो वर्षे विदेशी आक्रमकांचा गुलाम राहिल्यामुळे आपले अस्तित्व विसरलेल्या देशातील नागरिकांच्या कारभाराची सूत्रे चालवणे, उच्च व निच्च असा भेद मानणार मोठा समाजवर्ग ज्या भूमीत आहे त्या प्रदेशाचा कारभार चालविणे हा एक वेगळा भाग आहे. या वस्तुस्थितीची जाणीव देशातील अग्रणी नेत्यांना होती. हा देश इंग्रज सोडून गेल्यानंतर पुन्हा खंड खंड तुटू नये. त्याकाळी प्रगत असलेल्या अमेरिका-इंग्लंड देशांसारखी प्रगती व विकास झालेले राष्ट्र आकारास यावे म्हणून या देशाला वेगवेगळ्या नियम, कायद्यांमधून चालवावे लागेल हे स्वातंत्र्य लढा लढणाऱ्या सेनानींनी ओळखले.
याच काळात अगाध बुद्धिमत्ता, विशाल विद्वत्ता व प्रचंड कर्तृत्व असलेला महाज्ञानी व्यक्तीश्रेष्ठ ब्रिटिश व्हाईसरॉय यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जल मंत्री, वीज मंत्री, रोजगार मंत्री, श्रम मंत्री, खनिज निर्मिती मंत्री म्हणून देशांच्या नागरिकांना सेवा देत होता. खुद्द ब्रिटिश व्हाईसरॉय लिनलिथगो वंदनीय व्यक्ती श्रेष्ठाला म्हणजेच डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांना 500 पदवीधरांच्या बरोबरीचा ज्ञानी मानायचा!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातल्या सर्वच म्हणजे सर्वच समस्यांची जाण होती. त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजेत याचे नियोजन त्यांच्यापाशी होते. जोपर्यंत भारतात औद्योगिकीकरण होत नाही. उद्योग वाढत नाहीत, तोपर्यंत भारतातील गरिबीचे, रोजगाराचे, वंचित वर्गाचे प्रश्न सुटणार नाहीत हा विचार त्यांनी त्याकाळी बोलून दाखवला होता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ज्ञ होते. अर्थतज्ञाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विचार मांडला होता. भारतात उद्योग येण्यासाठी, कारखाने चालण्यासाठी भरपूर प्रमाणात वीज हवी. वीज निर्माण करण्यासाठी धरणं हवी. भारतात शेकडो किलोमीटर लांबीच्या अनेक नद्या आहेत. त्या नद्यांवर धरणं बांधून, पाणी अडवून वीज निर्मिती करण्याचा पहिला विचार आणि यशस्वी प्रयोग त्यांनी सुरू केला.
बिहार, बंगाल, ओरिसा राज्यातून वाहत जाणारी सर्वात मोठी नदी होती दामोदर नदी. जिला बंगालचे अश्रू असे म्हणायचे. कारण या नदीवर शेकडो लोकांची प्राणहानी करणारे क्रूर, प्रलयंकारी पूर यायचे. दामोदर नदी योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली. अनेक धरणं बांधली गेली. वीज निर्मिती होऊ लागली.
पंजाब हरियाणातील सतलज नदीवरील भाकरा नांगल धरण, मध्य प्रदेशातून बिहार राज्यात वाहत जात गंगा नदीत विलीन होणाऱ्या प्रचंड मोठ्या लांबीच्या सोन नदीवर अनेक धरणं उभारण्याची सुरुवात झाली. वीज निर्मिती होऊ लागली. देशभरातील उद्योगांना हळूहळू वीज मिळू लागली. देश वेगळ्या पद्धतीने विकासाच्या वाटेवर येऊ लागला. पाणी अडवणे ते शेतीला पोहोचवणे, वीज निर्मिती करणे हे देश संपन्न होण्याचे गुणकारी मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीच्या काळात तयार करून दिले.
डॉ. बाबासाहेब यांची विद्वत्ता, देशाच्या उन्नतीचा त्यांचा विशाल दृष्टिकोन ओळखून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या देशभक्त अग्रणी सेनानींनी त्यांच्यावर देशाच्या राज्यघटनेला तयार करण्याची जबाबदारी सोपवली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे गुलाम राहिलेल्या भारत भूमीवर पुन्हा कुणी साम्राज्यवादी देशाने आक्रमण करू नये म्हणून राज्यघटनेत पहिला मुद्दा घेतला सार्वभौमत्वाचा. सार्वभौम म्हणजे कोणत्याच परक्या देशाच्या नियंत्रणाखाली नसलेला व स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा सर्वश्रेष्ठ असा देश होय. हे सार्वभौमत्व जर कोणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर सार्वभौमत्व कायद्याने भारत सैन्य दल निर्माण करेल अशी तरतुद राज्य घटनेत करण्यात आली. भारताच्या तीन सैन्य सेना गठीत करण्यात आल्या. देशावर वाकडी नजर टाकणाऱ्या विरूद्ध तिन्ही सेनादले शत्रू विरुद्ध कारवाई करतील अशी रचना करण्यात आली. सार्वभौमत्व तरतुदीमुळे देशाची ताकद पहिल्याच झटक्यात वाढवून गेली.
देशाच्या विकासात जोपर्यंत सर्वच नागरीक सहभागी होत नाहीत तोपर्यंत विकास होणे अशक्य आहे, हे ओळखून विकेंद्रीत राज्यकारभार पद्धती (सत्तेचे विकेंद्रीकरण), मूलभूत हक्क व अधिकाराची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. मूलभूत हक्कांमुळेच भारतातील सर्वच जाती, समाज घटकातील नागरिक शिक्षण, व्यापार, उद्योग करायला लागली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हायला लागली. मूलभूत हक्क अधिकारांमुळेच माणसांनी माणसांवर घातलेल्या अनेक अमानवी अशा मर्यादा आपोआपच गळून पडल्या.
विकेंद्रीत राज्यकारभार पद्धती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे. राज्यघटनेत तशी तरतूद केली आहे. देश पातळीवरील कारभार व राज्य पातळीवरील कारभार वेगवेगळ्या संस्थांनी करावा. प्रत्येकाने आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. छोट्या गावापासून ते तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर कारभार एकाच्याच हातात असणे योग्य नाही. वेगवेगळ्या भागात सत्ता चालविणारे वेगवेगळे असतील. आपापल्या गावाच्या निर्णय प्रक्रियेत अनेक लोकांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात. नवनवीन बदल करावेत. आधुनिक कल्पना राबवाव्यात. त्यातून विकास साधावा, हा विकेंद्रीत राज्यकारभाराचा (सत्तेचे विकेंद्रीकरण) गाभा आहे. विकेंद्रीत राज्यकारभारामुळे लोकशाही आपल्या भारतात सुदृढ बनली आहे. चुकीचे निर्णय घेतले जात नाही. यामुळे बहु विविधता असूनही आपला देश योग्य रस्त्यावर विकासाची धाव घेऊ लागला आहे.
आज आपला भारत देश शक्तिशाली राष्ट्र आहे. जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख सीईओ भारतीय आहेत. इस्रो सारखी अवकाश विज्ञानात कार्य करणारी जागतिक संस्था भारतात निर्माण झाली आहे. जगातल्या शेकडो देशांना भारताने इंजिनीअर्स दिले आहेत. हा चमत्कार जो घडलेला आपण पाहत आहोत, तो चमत्कार म्हणजे भारताच्या राज्यघटनेने केलेली सामाजिक क्रांती होय. एक अर्थशास्त्रज्ञ देश कसा घडवू शकतो हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून साऱ्या जगाने पाहिले आहे. म्हणूनच कोलंबिया सारखी विश्वविख्यात युनिव्हर्सिटी त्यांना ‘सिंबल ऑफ नाॅलेज’ ही पदवी बहाल करते. देशाला या शिल्पकाराने आपल्या प्रामाणिक स्वच्छ विचारातून व बुद्धीरूपी छिनी हातोड्याने आकार दिला आहे. ते खरेखुरे शिल्पकार आहेत. त्यांचे अनंत उपकार शेकडो शतके जरी उलटली तरी फिटू शकणे अशक्य आहे.
या महान समतेच्या सागराला आज जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!!!
– केशव राजभोज,
गुरू रविदास नोकरदार मैत्री संघ, नंदुरबार