50 thousand rupees per kilo of potatoes!
अबब! तब्बल ५० हजार रुपये किलो बटाटे!
Paris पॅरिस: फ्रान्समध्ये विकल्या जाणाऱ्या एका बटाट्याची किंमत तब्बल ५० हजार रुपये किलो असल्याचे समोर आले आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भलतीच महाग फळं आणि भाज्या मिळतात. जपानची तर महागड्या फळांसाठी एक वेगळीच ओळख आहे. रूबी रोमन ग्रेप्स ही लाल द्राक्षे असोत किंवा युबारी किंग टरबूज असो, तिथे अशी अनेक महागडी फळे मिळतात. काही भाज्यांच्याही अल्लाच्या सव्वा किमती असतात. मात्र बटाटा असा भलत्याच किमतीत विकला जात असेल याची कल्पना नव्हती.
फ्रान्समध्ये असा बटाटा विकला जातो आणि त्याची किंमत तब्बल ५० हजार रुपये किलो आहे. बटाट्याची ही प्रजाती नेहमीच्या बटाट्यापेक्षा वेगळी आहे. तिचे नाव आहे ‘ला बोन्नोते’. विशेषत: फ्रान्समध्येच अशा बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. तेही विशेष ऋतूतच. फ्रान्सच्या इले डे नोरमौशियर या बेटावर अशा बटाट्यांची शेती होते. संपूर्ण बेटावर ही शेती होत नसून बेटाच्या केवळ ५० चौरस मीटर इतक्या छोट्या भागातच ही शेती केली जाते. वर्षातील केवळ १० दिवसच हे बटाटे लोकांना उपलब्ध असतात व त्यांना मागणीही मोठी असते. या बटाट्यांना अतिशय चांगली चव असते. त्यांचा वापर सॅलडमध्ये तसेच भाजीतही केला जातो. या बटाट्याचे उत्पादन घेण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. त्यांना जमिनीतून बाहेर काढतानाही विशेष काळजी घेतली जाते, अन्यथा ते खराब होतात. या बटाट्यांमध्ये काही औषधी गुणधर्मही असल्याचे सांगितले जाते.