A nine-year-old boy was killed by a leopard
बिबट्याने घेतला नऊ वर्षाच्या मुलाचा बळी
Akkalkuva News अक्कलकुवा : शेतातील घराच्या अंगणात जेवण करण्यासाठी बसलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना अक्कलकुवा शहरानजीक घडली. शेतशिवारांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःची आणि विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी. लहान मुले बिबट्यासाठी सोपे सावज असतात. मुले खाली बसलेली असली तर ती अधिक सोपे सावज वाटतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुनर्वसन शिवारातील शेतात घरातील अंगणात जेवण करणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं. बिबट्याने या मुलाला जवळच्या शेतात नेलं आणि तिथे त्याच्यावर हल्ला केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (४ एप्रिल) संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घडली आहे. ४ एप्रिलला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात सुरेश भाईदास वसावे हा नऊ वर्षीय मुलगा जेवण करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने सुरेशवर हल्ला केला आणि त्याला जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात नेऊन गंभीरित्या जखमी केले. त्यामुळे सुरेशचा जागेवरच मृत्यू झाला. सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर बिबट्याने लचके तोडले. यामध्ये या मुलचा जागीच मृत्यू झाला.
बिबट्याने मुलाच्या शरीरातील पूर्ण रक्त पिऊन घेतल्याने शरीर कोरडे पडले होते. दरम्यान, मुलाच्या काकूने आरडाओरड करून सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल डी गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा शोध घेतला. घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा करून सदर बालकास शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले.