Shiv Sena aggressive due to interrupted power supply, Rastraroko movement in full sun
खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे शिवसेना आक्रमक, भर उन्हात रास्तारोको आंदोलन
Dhule धुळे : शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध करीत शिवसेनेने ( उ.बा.ठा) मंगळवारी दुपारी भर उन्हात अर्धातास रस्त्यावर बसुन रास्तारोको केले. प्रभारी अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून जाब विचारत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, थोडे जरी वादळ, वारा, आणी पाऊस सुरू झाला तर तासन तास वीज पुरवठा खंडित होत आहे. वाढत्या उष्मामुळे नागरिकांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असताना लाईट गेल्यावर लहान बालके, वयोवृद्ध, व्यापारी प्रतिष्ठाणे ,शासकीय कार्यालये एवढेच काय मनपाचा पाणी पुरवठा विभागही त्यामुळे हवालदिल झाले आहेत. विजेअभावी जलकुंभ भरलेच जात नसून नागरिकांना आधीच आठ दिवसानंतर मिळणारे पाणी आता दहा ते बारा दिवसाआड मिळु लागले आहे. पुरेशा विजेच्या अभावी इन्व्हर्टर चार्ज होत नाही.
विजेवर आधारीत छोटेमोठे व्यावसायिक, पाॅवरलुमधारक हैराण झालेले असून त्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. नेमेची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे विद्युत कंपनीकडून वीज तारांना अडसर ठरणारी झाडे तोडण्याची कामे, जिर्ण व लोंबकळत असणाऱ्या तारा, उघड्या असलेल्या डीपी, एवढेच काय शहरात अनेक दाट वस्ती व काॅलनी परिसरासत अनेक विद्युत पोल वाकलेले असताना ते बदलविण्याचे किंवा दुरूस्तीचे काम अद्यापही करण्यात आलेले नाही. त्यामुळे वीज बिलांचा रेग्युलर भरणा करूनही नागरीकांना म्हणजे विद्युत वितरणच्या ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अटी शर्ती नुसार कंपनी सुविधा पुरविण्यात असर्मथ ठरत आहे. वीज खंडित झाल्यावर कर्मचारी तब्बल तास दोन तासानंतर दुरुस्तीसाठी पोहचतात. त्यांच्याकडे अनेकदा पुरेशी दुरुस्तीची साधने देखील नसतात. त्यामुळे अनेकदा नागरीक व कर्मचारी यात वाद होतात. याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत.
शहरातील लोंबकळत असलेल्या व जिर्ण असलेल्या तारा बदलविण्याबाबत तसेच भूमिगत तारा टाकण्याबाबत शासनाकडून अनेकदा निधी मंजुर होऊनही ती कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक पाहता फेज अनुसार शहरातील ९० टक्के ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली असतानाही विद्युत कंपनीकडून व अधिकारी वर्गाच्या अकार्यक्षमतेमुळे शहरातील पेठ भाग, मोगलाई, साक्रीरोड, महिंदळे, लालबाग, आझादनगर, कृषी महाविद्यालय, देवपूर, स्टेशन रोड आदी भागातील विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग देखील नसल्यामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत. निवेदनाचा गांभीर्याने विचार करून येत्या आठवडाभरात दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर पुर्ण करून खंडित विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नावर नागरीकांना दिलासा द्यावा. अन्यथा मोठे जनआंदोलन होईल. त्यातुन उपस्थित होणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावर अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा आंदोलनावेळी देण्यात आला.
आंदोलनात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, हेमा हेमाडे, जयश्री वानखेडे, संघटक गुलाब माळी, भरत मोरे, संदीप सुर्यवंशी, लखन चांगरे, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, महादु गवळी, सुनिल पाटील, छोटु माळी, आबा भडागे, कैलास मराठे, हेमंत बागुल, हिमांशु परदेशी, पंकज भारस्कर, आनंद जावडेकर, पिनु सुर्यवंशी, सागर निकम, अनिल शिरसाठ, अजय चौधरी, सुरेश बिसनारीया, विकास शिंगाडे, शत्रुघ्न तावडे, अमोल ठाकूर, अरूण पाटील, अक्षय पाटील, गुलाब धोबी, शुभम रणधीर, वैभव पाटील, मुकेश,भोकरे, सुरेश चौधरी, तेजस सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.