BJP rejected in Dhule Rural, MLA Kunal Patil’s dominance in Bazar Committee continues
धुळे ग्रामीणमध्ये भाजपला नाकारले, बाजार समितीवर आमदार कुणाल पाटील यांचे वर्चस्व कायम
Dhule News धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलने १६ जागांवर विजय मिळवित ३५ वर्षांपासूनची सत्ता कायम राखली आहे. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीचा दोन जागांवर पराभव झाला असे म्हणता येणार नाही. हमाल मापाडी मतदार संघातून भाजपचे महादेव परदेशी बिनविरोध निवडून आले होते.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल ३० एप्रिल रोजी घोषीत करण्यात आला. आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूण १५ जागांवर निवडणूक लढविण्यात आली होती. त्यात त्यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे १५ जागांवर प्रत्येक उमेदवाराने २२५ मतांपेक्षा अधिक अशा मोठ्या फरकाने मताधिक्य मिळवित विजय मिळविला आहे. या आधी व्यापारी मतदार संघातून विजय चिंचोले यांची एक जागा महाविकास आघाडीची बिनविरोध निवडून आली होती.
दिग्गजांचा पराभव
दरम्यान, दोन वेळा खासदार आणि मंत्री असलेल्या खा. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा आ. कुणाल पाटील यांच्या पॅनलने दारुण पराभव केला आहे. भाजपच्या पॅनलमधील बाळासाहेब भदाणे, रावसाहेब गिरासे, विजय गजानन पाटील या प्रमुख उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवाला तोंड द्यावे लागले. भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
विजयी उमेदवारांची नावे अशी
सेवा सहकारी मतदार संघातून कोतेकर गुलाबराव धोंडू (८५०मते), ठाकरे ऋषीकेश अनिलराव (८४६ मते), पाटील यशवंत दामू (८२७ मते), पाटील नानासाहेब देवराम (८२२ मते), पाटील बाजीराव हिरामण (८०४ मते), पाटील विशाल दिलीप (८०२ मते), माळी गंगाधर लोटन (७७३ मते), शिंदे विश्वास खंडू (८८९ मते), पाटील छाया प्रकाश (८८१ मते), पाटील नयना संदिप (८८४), पाटील कुणाल दिगंबर (८९० मते). ग्रामपंचायत मतदारसंघातून पाटील रावसाहेब धर्मा (६९४ मते), पाटील योगेश विनायक (७२७ मते), देवरे संभाजी राजपूत (७२८ मते), भिल सुरेश वंजी (७०३ मते) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
४० वर्षापासून सत्ता अबाधित
धुळे तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीवरील सत्ता महत्वाची ठरली आहे. राजकारणात अनेक स्थित्यंतरे आली. मात्र माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४० वर्षापासून काँग्रेसने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. १९८३ पासून माजी मंत्री पाटील यांचेच पॅनल बाजार समितीच्या निवडणूकीत विजयी होत आहे. आता पुन्हा आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवित काँग्रेस महाविकास आघाडीने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.