Land scam of 18 crores, the case will not be filed even after filing a complaint with evidence!
१८ कोटींचा जमीन घोटाळा, पुराव्यासह फिर्याद दाखल करूनही गुन्हा दाखल होईना!
Dhule Crime धुळे : शहरातील भूखंड माफियांनी सरकारी जमिनीला लागून एक भूखंड खरेदी केला. त्यानंतर महानगरपालिका आणि महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून, खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करीत सरकारी भूखंड देखील आपल्या नावावर केला. त्या भूखंडावर प्लॉट विक्रिला काढले. एकाने प्लॉट खरेदी केला. पण त्या प्लाॅटचा उतार मिळाला नाही. कारण तलाठीच्या दफ्तरी प्लाॅट अस्तीत्वातच नाही. तलाठीने उतारा देण्यास नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे गोळा करून राजेंद्र पैलवान शिंदे यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीने पुराव्यासह पोलिसांना फिर्याद दिली. पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण सरकारी यंत्रणेला काहीही फरक पडला नाही. सरकारी जागा बळकावली तरी आजही गुन्हा दाखल नाही. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून गुन्हा दाखल झाला नाही तर राजेंद्र शिंदे न्यायालयात दाद मागणार आहेत. काहीही झाले तरी आपण मागे हटणार नाहीत असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
गांभीर्याची बाब म्हणजे हडप केलेल्या सरकारी भूखंडावर विक्रीसाठी काढलेल्या प्लाॅटची सरकारी दफ्तरी दोन वेळा रजिस्टर खरेदी झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
शर्मा कुटूंबाने महसुल, सीटीसर्व्हेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन १८ कोेटींचा भूखंड घोटाळा केला असून, संबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात राजेेंद्र शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, बाभुळगाव खु. ता.येवला येथील मयुर जाधव आणि त्यांची पत्नी सिमा जाधव यांनी १५ ऑक्टोबर २०२० रोजी धुळ्यातील शांतीबाई शर्मा, दीपक शर्मा, दिनेश शर्मा यांच्याकडून सर्वे क्र.४९५ /२-४/ब/१ या क्षेत्रातील प्लॉट क्र.२५ विकत घेतला होता. हा प्लॉट राजेंद्र शिंदे यांनी रितसर सौदा पावती नोटरी करुन जाधव यांच्याकडून विकत घेतला. प्लॉट खरेदीच्या कागदपत्रांची जमवाजमव करत असताना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठ्याकडे गेले असता तलाठ्याने या प्लॉटचा उतारा तयार झालेला नाही. म्हणजेच दफा उघड झालेला नाही, असे सांगितले. त्यानंतर सीटीसर्व्हे कार्यालयात कागदपत्रांची मागणी केली असता वरील सर्वें क्रमांकमधील प्लॉट क्र.२५ चा सातबारा उतारा आमच्या कार्यालयात आलेला नाही.
प्लॉट क्र.२५ चा सातबारा उतारा उघडणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच सदर उतार्यावरुन नगरभुमापन क्रमांक १०३७६/२ तयार होणे गरजेचे होते. पंरतु भुमापन मधील संबंधीतांनी कोणतीही खातरजमा न करता मिळकत पत्रीका १ मे २०२२ रोजी तयार केली. महापालिका, नगरचना अधिकारी, मोजणी अधिकारी यांनी सुध्दा कागदपत्रांची खातरजमा न करता सरळ सदर प्रकरण मंजुर केले आहे. हा प्लॉट जिथे आहे, त्या शेत जमिनीचा मालक दीपक शर्मा आणि इतर दोघांनी एन. ए. साठी १५ मे २०१८ रोजी ६५ हजार ३४० रुपये चलनाने भरणा केले आहे. फक्त १ हेक्टर २४ आर जमिन बिनशेती करण्यासाठीचा हा भरणा होता. त्याबाबतचे पत्रक अपर तहसिलदार यांनी धुळे शहर तलाठ्यांना दिलेले आहे.
दीपक शर्मा यांची जमीन १४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी असताना ती १८ हजार चौ.मी.ची बिनशेती वर्ग करण्याची दिलेली परवानगी धक्कादायक आहे. पदाचा गैरवापर करुन ४ हजार चौरस मीटर जास्त जमीन बिनशेतीकडे वर्ग केलेली आहे. दीपक शर्मा, दिनेश शर्मा, शांतीबाई शर्मा यांनी संगनमताने हा गुन्हा केलेला आहे. बिनशेती झाल्यावर सनद मंजुरीसाठी दीपक शर्मा यांनी २१ जुलै २०२० रोजी अपर तहलिसदारांकडे अर्ज दिला होता. त्यानुसार अपर तहसिलदारांनी सनद मंजुरीबाबत सदर तलाठींना पत्र देवून सदर शेतजमीन बिनशेतीकडे वर्ग करुन सातबारा उतारा इकडे सादर करावा व सदर सातबारा उतारा बिनशेतीकडे वर्ग झाल्यानंतर सातबारा उतारा बंद असा शेरा घेण्यात यावा, असे पत्र दिले होते. त्यानंतरही शहर तलाठ्यांनी सदर जमिनीचा सातबारा उतारा उघडलेला नाही व तो बंदही केला नाही. म्हणून यंत्रणनेने भुखंडाचे क्षेत्र १२ हजार ३०० चौरस मीटर असताना परस्पर संगनमत करुन कागदपत्रांचा आधार न घेता ५ हजार ७०० चौ. मी. इतके जास्तीचे क्षेत्रफळ वाढवुन घेतले आहे.
या सर्वांनी शासकीय कागदपत्रात अफरातफर करुन ६१ हजार चौरस फुट जागा बळकावली आहे. सदर जागेची बाजार भावाप्रमाणे किंमत १८ कोटी रुपये आहे. कायद्याचा गैरवापर करुन प्लॉट धारकांचे आर्थिक नुकसान व शासनाचे आर्थिक नुकसान होण्याच्या उद्देशाने संघटीत स्वरुपाची गुन्हेगारी केली आहे. त्यामुळे संबंधीतांवर भादंवि १२० ब, ४२०, ४६७ सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे.