Bribery policemen Trap in ACB
पोलिसांच्या जाचाला तो कंटाळला होता, त्रास देणाऱ्याला त्याने चांगलीच अद्दल घडविली
Dhule Crime News धुळे : पोलिसांच्या जाचाला तो कंटाळला होता. अखेर त्याने बुधवारी टोकाचे पाऊल उचलले आणि त्रास देणाऱ्याला चांगलीच अद्दल घडविली. त्याला २०० रुपयांची लाच घेताना पकडून दिले. धुळे शहरात बारा पत्थर चौकात बुधवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनीच पोलिसाला पैसे घेताना पकडले, अशी चर्चा दिवसभर सुरू होती.
चाळीसगाव येथील एका वाहनचालकाकाचे धुळे शहरात रोज येणे-जाणे आहे. कामानिमित्त येणाऱ्या वाहन चालकाला धुळे शहरात बारा पत्थर चौकात नेहमीच अडविले जात होते. आॅनलाईन मोठ्या रक्कमेचा दंड आकारण्याची धमकी देऊन वाहतूक पोलीस त्यांच्याकडून कधी २०० तर कधी ५०० रूपये तडजोडीची रक्कम वसूल केली जात होती. वाहतूक पोलिसांच्या या नेहमीच्या जाचाला हा वाहनचालक कंटाळला होता. वाहतूक पोलिसांच्या ड्युटी सतत बदलत असतात. बारा पत्थर चौकात ३ हे रोजी उमेश दिनकर सूर्यवंशी या पोलीस कर्मचारीची ड्युटी होती. सदर वाहनचालक वारंवार दंड भरतो आहे, हे लक्षात आल्यावर उमेशची हिम्मत वाढली. त्याने दंडाऐवजी त्याला लाचेची मागणी केली.
संबंधित वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक आपल्याला आर्थिक आणि मानसिक त्रास देत असल्याने त्रस्त वाहन चालकाने त्याला अद्दल घडविण्याचे ठरविले. आपल्याकडे पैसे नसल्याने पैसे घेऊन येतो असे सांगून सदर वाहनचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी गेला. तोपर्यंत एसीबीने सापळा रचला होता. एक पोलीस कर्मचारी त्या वाहन चालकाच्या सोबत दिला. शहरातील बारा पत्थर परिसरात उमेश सूर्यवंशी हा नेहमीप्रमाणे उभा होता. उमेश सूर्यवंशीने त्या वाहन चलाकाला ओळखले आणि गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर उमेशने दोनशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे लाचेची मागणी उमेश सूर्यवंशी करत असल्याचे सिद्ध झाले. त्याच ठिकाणी २०० रुपयांची लाच स्वीकारताना उमेशला एसीबीने रंगेहात पकडले.
धुळे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण नेहाळदे, वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.