Give Scheduled Tribe Certificate to Koli Society!
कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या!
Dhule News धुळे : कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी सुरू असलेले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी प्रशासनाची विनंती उपोषणकर्त्यांनी फेटाळून लावली. उपोषणाला दहा दिवस पूर्ण होत असताना उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.
काेळी समाजाला अनुसूचीत जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात व ते सुलभेतेने मिळावे, यासाठी धुळे शहरात जेल राेडवर गेल्या नऊ दिवसांपासून वीरांगणा झलकारीबाई काेळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेतर्फे गिताजंली काेळी आणि हिराभाऊ काकडे यांचे आमरण उपाेषण सुरू आहे. त्यांच्या उपाेषणाचा बुधवारी नववा दिवस हाेता. मंगळवारी रात्री गितांजली कोळी यांची प्रकृत्ती खलावल्याने सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, अपर तहसिलदार विनाेद पाटील यांनी त्यांची भेट घेत उपाेषण मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र त्यांनी ती फेटाळून लावली. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होत नाही तोपर्यंत उपाेषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी काेळी समाजातर्फे अक्राेश माेर्चा काढण्यात आला, तेव्हा संबंधितांना प्रातांधिकाऱ्यांबराेबर बैठक घेवून मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र माेर्चाला अडीच महिने हाेऊनही काेणतीही बैठक घेण्यात आली नाही. समाज बांधवांच्या प्रश्नांवर कोणताही तोडगा काढला नाही. तसेच प्रांताधिकारी देखील कुठलेही कागदपत्र न तपासता वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या जिल्ह्यातील मुळ निवासी आदिवासी असलेल्या कोळी ढोर, टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी यांना १९५० पूर्वी कोळी नोंद असल्याच्या कारणावरून सरसकट दाखले नाकारतात. तसेच कोणत्याही प्रकारच्या घरकुल, खावटी या सारख्या योजनांचा लाभ समाज बांधवांना मिळत नाही. यासाठी आमरण उपाेषण सुरू आहे.
दरम्यान, बुधवारी शिवसेनेने (उबाठा) या आंदोलनाला पाठिंबा दिला. माजी आमदार प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. याआधी फुले शाहू आंबेडकर समितीसह विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्यभरातून कोळी समाजाचे पुढारी आणि कार्यकर्ते दररोज उपोषणकर्त्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.