Release water from Akkalpada project, villagers demand
अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडा, गावकऱ्यांची मागणी
#Dhule News धुळे : उन्हाळ्याच्या पार्श्भूमीवर नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सह्यानिशी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, उन्हाळा सुरू असून शेतातील तसेच विहिरीसह ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरविणाऱ्या विहिरींची पातळी खालावली आहे. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पांझरा नदी पात्रात आक्कलपाडा धरणाचे पाणी सोडले जाते. या पाण्याचा लाभ धुळे व शिंदखेडा तालुक्यातील नदीकाठी असलेल्या वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद, वाघोदे, मुडी, मांडळ, कळबु, ब्राम्हणे, बिलाडी या गावांना होत असतो. त्यामुळे प्रशासनाने अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.