Before Hitler massacred 7 million civilians, he made a film like ‘The Kerala Story’.
हिटलरने ७० लाख नागरिकांचा नरसंहार करण्याआधी ‘द केरला स्टोरी’ सारखा वाह्यात चित्रपट बनवला होता
Dhule News धुळे : हिटलरने ७० लाख नागरिकांचा नरसंहार करण्याआधी ‘द केरला स्टोरी’ सारखा वाह्यात चित्रपट बनवला होता, अशा शब्दात एआयएमआयएमचे नेते खासदार असउद्दीन ओवैसी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी केली. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, चित्रपटाचे प्रमोटर नाहीत, अशी खोचक टिकाही ‘ द केरला स्टोरी’ चित्रपटावरून खासदार ओवैसींनी सोमवारी धुळ्यात केली.
ओवैसी म्हणाले, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट खोट्या घटनेवर आधारित आहे. गरीबीचे प्रमाण कमी असलेल्या केरळ राज्याची खरी ओळख वेगळी आहे. शिक्षणात अग्रेसर असलेल्या या राज्यामुळे देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळते. हे दाखविण्याऐवजी वाह्यात चित्रपटातून भलतंच काही दाखविले जात आहे. या चित्रपटावरून त्यांनी हिटलरच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करून नाव न घेता मोदींची तुलना हिटलरशी केली. मोदींनी माझ्यावर कितीही टिका केली तरी मला फरक पडत नाही. मोदींनी केवळ चर्चा करणे थांबवावे आणि काम करावे अशी खोचक टिकाही त्यांनी केली.
राज्यात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. लव्ह जिहादच्या नावाने राजकारण आणि जातीयवाद करणाऱ्या शिंदे-फडणविस सरकारने मुली बेपत्ता होण्याच्या घटनांवर जनतेला उत्तर द्यावे.
पुस्तक प्रकाशन आणि निवृत्तीच्या मुद्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवरही टिका केली. कर्नाटकच्या जनतेने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एआयएमआयएम पक्षाचे नेते सोमवारी धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. पक्षाचे आमदार फारुख शाह यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली आणि नवविवाहित दांपत्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात २४ जोडप्यांचे लग्न लागले.
तसेच त्यांनी चाळीसगाव रोड कब्रस्थानच्या कामाचा शुभारंभ केला. त्यानंतर चाळीसगाव रोड दोन्ही बाजुस गटार व पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण देखील केले. मदरसा फलाह दारेन कंपाऊंड वॉल कामाचे लोकार्पण केले.
धुळे शहराचे आमदार फारूख शाह दरवर्षी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील जोडप्यांचे मोफत लग्न लावले जाते. तसेच या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यही मोफत दिले जाते. खासदार असउद्दीन ओवैसी यांचे सायंकाळी साडेपाच वाजता धुळे शहरात आगमन झाले. कब्रस्थानच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने चाळीसगांव रोडवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ओवैसी थांबलेल्या हाॅटेलमध्ये देखील तरूणांनी सेल्फीसाठी गर्दी केली होती.