Regulate the grain stock, ration shopkeepers gave a statement to the administration
धान्यसाठा सुरळीत करा, रेशन दुकानदारांनी दिले प्रशासनाला निवेदन
Dhule News धुळे : तालुक्यात धान्यसाठा पूर्ववत व सुरळीत करावा, तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 मध्ये नियमित धान्याचा भरणा केल्याची रक्कम व कमिशन मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे.
याबाबत धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासकीय गोदामातून मार्च 2023 व एप्रिल 2023 चा धान्यसाठा दुकानात पुरवठा होत असताना फक्त गहू पाठविला जात आहे. ग्रामीण भागातील सर्वच दुकानांमधून केवळ गहू वाटप होत असल्याने ग्राहकांकडून तांदूळाची देखील मागणी होत आहे. प्रशासनाकडून किंवा धान्य गोदामातून तांदूळ पुरवठा होत नसल्याने रेशनकार्डधारक लाभार्थी तक्रारी करत आहेत.
या उलट धुळे शहरात गहू आणि तांदूळ नियमित वाटप होत आहे. तसेच त्यांना मे महिन्याचा साठा देखील प्राप्त झाला आहे. केवळ ग्रामीण भागामध्ये दोन महिने उशिराने धान्याचा पुरवठा होत असून, त्यातही तांदूळ नसल्याने रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचा तांदूळ साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 मध्ये नियमित धान्याचा भरणा ग्रामीण रेशन दुकानदारांचा झाला होता. दुकानदारांनी आदेशाचे पालन करून नोव्हेंबर व डिसेंबर 2022 पासून दोन भरणा केलेला आहे व धान्य मोफत वाटप केले. त्यामुळे भरण्याची रक्कम व कमिशन मिळावे, अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर रंगराव पाटील आणि तालुकाध्यक्ष विलास वसंतराव चौधरी यांच्या सह्या आहेत.