Dharne movement for pending demands of journalists
पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन
Dhule News धुळे : पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे गुरूवारी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण तसेच धुळे शहरात देखील निदर्शने करण्यात आली.
प्रमुख मागण्या अशा
पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यास भरीव निधी द्यावा, पत्रकारांच्या घरांसाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून द्यावा, वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या जाहिरातींवरील जीएसटी रद्द करावा, कोरोना काळात मृत पावलेल्या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिकृती पत्रक देण्यात यावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिकांना मारक ठरत असून लघु दैनिकांना देखील ब वर्ग मध्यमवर्गीय दैनिकांप्रमाणेच जाहिरात द्यावी, सप्ताहिकांना देखील त्याच प्रकारे जाहिरातींचे धोरण लागू करावे, या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
सर्व तालुक्यातील तहसीलदार आणि सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले आहे. धुळे जिल्ह्याचे व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आला.
या आंदोलनात पत्रकार सुनील बैसाणे, धनंजय दीक्षित, डॉ. नागसेन बागुल, संघटनेचे शहर कार्याध्यक्ष नागींद मोरे, निलेश परदेशी, संतोष इशी, तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवन, दिलीप वाघ, सिध्दार्थ मोरे, रोशन खैरनार आदी सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.