The scam of lakhs in Dhule Municipal Corporation was revealed by the Mayor
धुळे महापालिकेतील लाखोंचा घोटाळा महापौरांनी केला उघड
Dhule News धुळे : शहराची स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी गुरुवारी ओळख परेड घेतली. यावेळी ५० टक्के कर्मचारी गैरहजर होते. याचा अर्थ निम्मे कर्मचारी सतत गैरहजर असतात असा होतो. या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या ठेकेदाराची बनावटगिरी खुद्द महापौरांसमोरच उघड झाली. कंत्राटी कर्मचारी वेतन देयकातील लाखो रुपयांचा घोटाळा महापौरांनी उघड केला.
धुळे शहराच्या सर्व प्रभागातील स्वच्छता, जलकुंभावर सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेका आस्था स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेबाबत श अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने तसेच प्रत्यक्ष उपस्थित कामगारांच्या हजेरीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने संस्थेच्या सर्व कामगारांची ओळख परेड घेण्याबाबत महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी आदेशित केले होते. त्यानुसार महापौर यांच्या समक्ष प्रशासनाने सदर कर्मचारी ओळख परेड एकविरा देवी मंदिराजवळील उद्यानात घेतली. आस्था स्वयंरोजगार संस्थेच्या ठेकेदाराने आरोगय विभागासाठी २२३, पाणीपुरवठा विभागासाठी ४० अशा एकुण २६३ कर्मचाऱ्यांचा ठेका ठेका घेतला आहे. परंतु ओळख परेड घेतली असता प्रत्यक्षात फक्त १०४ कर्मचारी हजर होते. तर १५९ कर्मचारी पाहणी प्रसंगी गैरहजर आढळून आले. तसेच कर्मऱ्यांकडे गणवेश, ओळखपत्र, सुरक्षा सहित्य, आढळुन आले नाही. अनेक बनावट कर्मचारी हजर केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात काम करत असलेल्या ठिकाणाची माहिती विचारली असता अनेक कर्मचाऱ्यांना कामाचे ठिकाण व प्रभागाचे नाव सांगता आले नाही.
वेतन देयकात लाखोंचा घोटाळा
ठेका कर्मचाऱ्यांना महापौरांनी विचारणा केली असता सदर ठेकेदार कर्मऱ्यांना दरमहा २६ दिवसांचे एकूण पाच हजार रूपये वेतन अदा करतो, असे कर्मचाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. धुळे महानगरपालिकेतर्फे प्रती कर्मचारी प्रतीदिन देयक ५०७.६३ रुपये याप्रमाणे २६ दिवसांचे १३ हजार रुपये अदा केले जातात. या कर्मचारींचा मासिक पगार एकूण २६३ कर्मचारी गुणिले १४ हजार बरोबर ३४, २०,००० इतकी अंदाजित रक्क्म दर महिन्याला संबंधित ठेकेदारास अदा केली जाते. धुळे मनपाकडे शहरातील तमाम नागरिकांनाकडून कर रूपाच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून संबंधित ठेकेदारास दरमहा लाखो रूपयाचे देयके अदा केली जातात. त्यामुळे सदर ठेकेदारास बोगस अवाजवी देयके दिल्याने महानगरपालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान व आर्थिक फसवणूक होत आहे.
कागदोपत्री दाखविलेले पण प्रत्यक्षात नसलेल्या कर्मचाऱ्यांची देयके प्रशासनामार्फत का अदा केली जात आहेत? तसेच आरोग्य विभागामार्फत महापौरांना पुरविलेल्या ठेका कर्मचाऱ्यांची यादी व प्रत्यक्षात पाहणी करताना ठेकेदाराने सोबत आणलेली यादी यामध्ये मोठी ताफावत आढळून आली. आरोग्य विभागाकडे ठेका कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी नसल्याचे आरोग्य विभाग कार्यालय प्रमख व उपस्थीत सर्व स्वच्छता निरिक्षक यांनी मान्य केले. त्यामुळे सदर ठेकेदाराला मनपामार्फत बिल अदा करताना कोणती यादी ग्राह्य धारली जाते व कोणता निकष लावला जातो, याबाबत महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना विचारले असता, त्यांना समाधानकारक खुलासा देता आला नाही.
सदर ठेकेदाराला पाठीशी घालणारे व स्वत:चा आर्थिक लाभ करून घेणारे प्रशासनातील काही प्रमुख अधिकारी व आरोग्य विभागातील कार्यालय प्रमुख, स्वच्छता निरिक्षक यांच्यावर तात्काळ दंडात्मक कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी सुरू करून आरोग्य विभागाचे कामकाज पारदर्शक व सुरळीत करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र माईनकर, स्वच्छता निरिक्षक संदीप मोरे, साईनाथ वाघ, गजानन चौधरी, शुभम केदार, गौरव माळी, मुकादम राजेंद्र पाटील, रविंद्र माळी, महेश सोनवणे, संस्थेचे ठेकेदार जाकीर शेख उपस्थित होते.