Provision of loans of Rs.1 crore each to self-help group groups for empowerment of tribal women
आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट समुहांना प्रत्येकी एक कोटींचा कर्ज पुरवठा
Dhule News धुळे : विद्यार्थींसह शिक्षक आणि कर्मचार्यांना शिस्त लागावी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील आदिवासी वसतिगृहे आणि आश्रमशाळांमध्ये फेस रिडींग सिस्टीम कार्यान्वीत करणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि शिरपूर या आदिवासी बहुल तालुक्यांमधील सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक मंत्री विजयकुमार गावीत यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. डॉ. गावित यांनी सांगितले की, राज्यातील आदिवासी क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी मजुरांची ट्रॅकिंग सिस्टीम प्रणाली कार्यान्वीत केली जाणार आहे. त्याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होईल. तसेच सिंचनाचे प्रकल्प उभारुन शेतजमीनी बागायती करण्यावर भर दिला जाईल. शेतकरी, शेतमजूरांना दूधाळ जनावरांचे वाटप केले जाईल. सीमावर्ती भागातील साडेबारा हजार लाभार्थींना दूधाळ गायींचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतराला आळा बसेल.
आदिवासी महिला आणि तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट समुहांना उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय केले जात आहे. साक्री तालुक्यात पाच समुहांसह राज्यातील २८ बचत गट समुहांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा पतपुरवठा केला असून, येत्या महिन्याभरात राज्यात ३० ते ४० समुहांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे अर्थसहाय केले जाणार आहे. सिताफळ, जांभूळ, आंबा, कैरी यांसारख्या वन उपजावर प्रक्रीया उद्योग सुरु करुन आदिवासींना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु असून, निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंत्री गावित यांनी सांगितले की, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्यांना शिस्त लागावी याकरिता वसतिगृह आणि आश्रमशाळांमध्ये हजेरीची फेस रिडींग सिस्टीम कार्यान्वीत केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत रिक्त जागा भरल्या जातील. दर तीन महिन्यांनी ऑनलाईन परीक्षा घेवून मुल्यांकनाच्या आधारे सुधारणा केल्या जातील. विविध भाषा मंडळांमधील तज्ज्ञांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करुन विद्यार्थींना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.