Smuggling of liquor from Maharashtra in Gujarat where liquor is prohibited
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातून मद्याची तस्करी
Dhule News धुळे : दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून दारू जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या धुळे जिल्ह्यातून दारूची तस्करी केली जाते. शेजारच्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातूनही मद्याची तस्करी होते. शिरपूरमार्गे सर्वाधिक मद्यसाठा धुळेमार्गे गुजरातला तस्करी केला जातो.
प्रायव्हेट गाड्यांमधून दारूची तस्करी केली तर या गाड्या तपासणी नाक्यांवर अडविल्या जातात. म्हणून दारू तस्करांनी एक वेगळी शक्कल लढविली असून, चक्क एसटी महामंडळाच्या लालपरी बसमधून दारूची तस्करी सुरू केली आहे.
अशाच पध्दतीने अमळनेर-बडोदा बसमधून होणारी देशी दारूची तस्करी चालक, वाहक आणि डेपो मॅनेजरच्या सतर्कतेमुळे उघड झाली. अमळनेर-बडोदा बसमध्ये एका दारू तस्कराने तांदळाच्या सालचा भुसा असलेल्या गोण्यांमध्ये ९० मिलिलीटरच्या प्लास्टिकच्या सीलबंद ७०० बाटल्या लपविल्या होत्या. देशी दारूचा हा साठा गोण्यांमध्ये असल्याने वाहकाला संशय आला. सकाळी दहा वाजता धुळे बस स्थानकात बस आल्यावर वाहकाने डेपो मॅनेजरला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर धुळे आगाराच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलिसांना बसस्थानकात बोलावून घेतले. पोलिसांनी बसमधील या गोण्यांची तपासणी केली असता, त्यात देशी दारूचा साठा आढळून आला. २४ हजार ५०० रुपये किमतीचा हा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दारूची तस्करी करणारा प्रवीण मोतीराम पाटील (रा. सुरत) याला अटक केली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस नाईक कुंदन पटाईत, पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील, महेश मोरे, मनीष सोनगिरे, अविनाश कराड, निलेश पोतदार आदींनी केली.
दारू तस्करीची नंदुरबार स्टाईल
नंदुरबार आणि नवापूर ही दोन्ही शहरे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आहेत. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने या शहरांमधून गुजरातला मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. यासाठी सर्रासपणे रेल्वेचा वापर केला जातो. नंदुरबार किंवा नवापूरमधून रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये दारूचा साठा बेवारसपणे ठेवला जातो. साठा ठेवणारी व्यक्ती गुजरातमधील व्यक्तीला फोन करून नेमक्या कोणत्या बोगीत साठा ठेवला आहे, याबाबतची माहिती देतो. गुजरात मधील व्यक्ती तो मद्यसाठा उतरवून घेतो. दारू तस्करीची ही नंदुरबार स्टाईल धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही वापरली जात असून, गुजरातला मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात आहे. या धंद्यात मोठी साखळी कार्यरत असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.